आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election, 2014, Divya Marathi

पोटनिवडणुकीचे निकाल विरोधात गेल्याने गर्भगळीत भाजपने बैठक गुंडाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून १३५ पेक्षा एकही जागा कमी घ्यायची नाही यासाठी नितीन गडकरींना विश्वासात घेण्यासाठी दिल्लीत आलेल्या भाजपच्या नेत्यांना पोटनिवडणुकीचे निकाल विरोधात गेल्याचे पाहून चांगलाच घाम फुटला. गडकरींनीही एक तासातच बैठक गुंडाळली. महाराष्ट्र बाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेच घेतील असे सांगून ते आपल्या दैनंदिन कामाला लागले व मोठ्या तावाने आलेले हे नेते हिरमुसले होऊन परतले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला १३५जागा देणार नाहीत असे स्पष्ट केल्याने अस्वस्थ झालेल्या राज्यातील भाजपच्या नेत्यांनी गडकरी यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी मंगळवारी दलि्ली गाठली. त्यात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे नेते विनोद तावडे आणि रवींद्र भुसारी यांचा समावेश होता. गडकरींच्या निवासस्थानी साडेअकरा वाजता बैठक सुरू झाली. भाजपची भूमिका काय असेल याबाबत आज निर्णय घेतला जाणार होता.
फडणवीस आणि तावडे यांनी शिवसेना जर अर्ध्या जागा सोडायला तयार नसेल तर आपण राज्यात स्वबळावर लढू शकतो. राज्यात संपूर्ण भाजपमय वातावरण झाले असून मोदी इफेक्ट अद्यापही कायम आहे; निर्विवादपणे सरकार स्थापण्याइतके संख्याबळ भाजपच्या वाट्याला येईल, असा विश्वास गडकरींना दिला.

शिवसेनेसोबत २५ वर्षे जुनी युती आहे व आपण महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ नेते असल्याने सल्ला देण्याची विनंती या चारही नेत्यांनी गडकरींना केली. याच चौकडीतील एकाने दिव्य मराठीला दिलेल्या माहितीनुसार प्रारंभी गडकरी यांनीही शिवसेना १३५ जागा सोडत नसतील तर आपण स्वबळावर लढण्यास हरकत नाही अशी भूमिका घेतली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातमधील पोटनिवडणुकीचा कल समाजवादी पार्टी आणि कॉँग्रेसच्या बाजूने येत असल्याची ब्रेकिंग न्यूज झळकली. तेव्हा गडकरी आणि या चारही नेत्यांनी टीव्ही संचावर लक्ष केंद्रित केले. सर्वच वाहिन्या भाजप उत्तर प्रदेश व राजस्थानमध्ये पिछाडीवर असल्याचे दाखवत असल्याने हे सर्वच नेते नाराज झाले. अवघ्या एक तासातच ही बैठक कोणताही ठोस निर्णय न घेता गुंडाळण्यात आली. कॉँग्रेसप्रमाणेच भाजपने शिवसेनेसोबत युती करायची किंवा नाही याचे सर्वाधिकार अमित शहा यांना देण्याचे ठरवण्यात आले. उद्या बुधवार अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असून युतीबाबत चर्चेअंती ठरवले जाणार आहे.

तावडेंना तंबी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे सातत्याने त्यांच्या भाषणातून मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. युतीचे सरकार आल्यास आणि भाजपकडे मुख्यमंत्रिपद आल्यास गृहमंत्रिपद शिवसेनेकडे जाईल असे सूत्र आहे. याबाबत काही नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. गडकरी यांनी आपण मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहोत, गृहमंत्रिपदाचे नाही, असे तावडेंना सुनावल्याचे सूत्रांनी सांगितले.