आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp Preparation For Election News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातही 'नंबर वन'साठी भाजपचे डावपेच; महिनाभर आधिच भाजपला हवा होता शिवसेनेकडून 'घटस्फोट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुती आणि आघाडीच्या तुटीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इतर सर्व पक्षांच्या तुलनेत सध्यातरी भाजपचे पारडे काहीसे जड दिसते. महायुतीतल्या तीन घटक पक्षांच्या बिनशर्त पाठिंब्याबरोबरच मोदी नामाचा करिष्मा या बळावर आपण सत्तेचा सोपान सहज गाठू, असा विश्वास भाजपला वाटतो आहे. सध्या राज्यात अनुकूल असलेले वातावरण, केंद्रात असलेली सत्ता यामुळे भाजप राज्यात एक क्रमांकाचा पक्ष बनू शकतो, असे भाजप नेत्यांना वाटते त्यासाठीच राजकीय डावपेचही आखण्यात आले आहेत.
शिवसेनेबरोबरची २५ वर्षांची दोस्ती संपुष्टात आल्यानंतर भाजपसमोर आता स्वबळ सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. 'मिशन १४५' हे ध्येय ठेवून या वेळेस भाजप लढणार आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या आधारे वाढलेला पक्ष ही प्रतिमा पुसून टाकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सध्या तरी महायुतीतल्या घटक पक्षांनी साथ दिल्याने इतर चारही पक्षांच्या तुलनेत भाजपची बाजू काहीशी वरचढ आहे. मोदी लाटेच्या भरवशावर भाजपने किमान २५० जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. यापैकी अनेक ठिकाणी तर भाजपचे अस्तित्वदेखील नाही. शिवाय, देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, िवनोद तावडे, पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार अशी नेत्यांची फौज जरी असली तरी एकट्याच्या बळावर सभा गाजवेल अशा गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्याची उणीव भाजपला नक्कीच जाणवेल. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हुकमी एक्का भाजपकडे असल्याने सध्यातरी प्रचाराची फारशी चिंता नाही. केंद्रातल्या मंत्र्यांचा ताफा आणि मोदींच्या चार-दोन सभा असे नियोजन करण्यात येत आहे.
मनसेकडेहीलक्ष : प्रचाराच्यारणनीतीचा विचार केला तर निवडणुकीनंतरची सत्तास्थापनेसाठीची अनिश्चितता लक्षात घेता भाजप सध्यातरी शिवसेनेला अंगावर घेणार नाही असेच दिसते. शिवाय राज्यातल्या महत्त्वाच्या महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधली सत्तेतली भागीदारी पाहता शिवसेनाही थेट भाजपवर हल्लाबोल करणार नाही अशीच शक्यता भाजपच्या नेत्यांना वाटते. दुसरीकडे मनसेला लगेचच जवळ घेण्याची घाई ना भाजपला आहे ना मनसेला. त्यामुळे निवडणूकपुर्व तरी भाजप आणि मनसे अशी युती होण्याची शक्यता अजिबात नाही. मात्र, सत्तास्थापनेसाठी भविष्यात मनसेची गरज लागू शकते हे लक्षात घेऊन काही ठिकाणी मनसेशी छुपी युती केली जाऊ शकते. नितीन गडकरी यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विभागवार नियोजनावर भाजपला भर द्यावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे फारसे अस्तित्व नसल्याने तिथे राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांना भाजपतर्फे अधिकाधिक रसद पुरवली जाईल.
युती तुटल्याचा कार्यकर्त्यांना आनंदच
भाजपच्या गोटात युती तुटल्याने आनंदाचे वातावरण आहे. नितीन गडकरींनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच युती तोडण्याचा आग्रह धरला होता. मात्र, हा निर्णय किमान महिनाभर आधीच घ्यायला हवा होता, अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. हे सारे महिनाभरापूर्वी झाले असते तर पुरेशा तयारीला वेळ मिळाला असता, असे अनेकांनी सांगितले.
रणमैदान मराठवाडा, विदर्भ
शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वर्चस्वाच्या लढाईत मराठवाडा विदर्भ हे रणमैदान असेल. त्यामुळे या दोन्ही विभागात भाजप अधिक बळ लावणार आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण या टापूत भाजपची शक्ती यथातथाच असल्याचे लक्षात आल्याने या भागात इतर पक्षातले तुल्यबळ नेते ओढण्याचा सपाटा भाजपने गेल्या काही दिवसांपासून लावला आहे. एकूणच या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष होण्याच्या दृष्टीने आखणी करणार हे निश्चित आहे.