आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण: पश्चिम महाराष्ट्रात \'राष्ट्रवादी\'समोर भाजपचे मोठे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड मानला जातो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर या पाच जिल्ह्यांत लोकसभेचे 10 तर विधानसभेचे साठ मतदारसंघ आहेत. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 10 पैकी चार जागा मिळवल्या. तसेच साठ पैकी 22 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजपची वाढती ताकद पाहाता विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीला जड जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडला आहे. पुणे, सांगली, सोलापूरमध्ये भाजपने आपले अस्तित्त्व दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात मोदी लाट ओसरल्याचे बोलले जात असले तरी भाजप पुन्हा मुसंडी घेईल, असे राजकीय विशेज्ज्ञांनी म्हटले आहे.

आर.आर.आबांना अजित घोरपडे देणार दे धक्का?
सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा पराभव करण्‍याचा विडा उचलला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ हा आर.आर.पाटील यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अजित घोरपडे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अजित घोरपडे हे आर.आर.आबांना दे धक्का देण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यात भाजपचे तीन विद्यमान आमदार आहेत.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदार संघात सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्ता भरणे यांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दत्ता भरणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक नेते आहेत. एकाच पक्षात राहून दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत, हे विशेष. पुणे जिल्ह्यात भाजपचे चार विद्यमान आमदार आहेत.

सोलापूरमध्ये दोन त‍र कोल्हापूरमध्ये भाजपचा एक आमदार आहे. भाजपची वाढती ताकद पाहता पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अधिक जागा काबिज करणे भाजपला काहीच अवघड नसल्याचे मतही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. पश्चिम महाराष्‍ट्रात भाजपचे एकूण 10 आमदार आहेत.

दुसरीकडे, शिवसेना-भाजपमधील महायुतीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेनेही पश्चिम महाराष्ट्रात आपली ताकद वाढीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राकडे अधिक लक्ष पुरवले आहे. पश्चिम मराहाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे सहा आमदार असून दोन खासदार आहेत.
पश्चिम महाराष्‍ट्रात कॉंग्रेसचा एकही खासदार नाही. सोलापूरमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला. सांगलीत कॉंग्रेसचे प्रतीक पाटील यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. कॉंग्रेसच्या हातात ज्या जागा होत्या त्या देखील गमावल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसचे 12 आमदार आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात पुन्हा आघाडी सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. कारण कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या 'कुबड्या' हाती घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण लोकसभा निवडणुकीत‍ राज्यातील जनतेने कॉंग्रेसला नापसंत केल्याचे उघड झाले आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी असतानाही बहुतांश मतदारसंघात दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला 'पश्चिम महाराष्ट्र' हा गड वाचवण्यासाठी ‍खूप परिश्रम घ्यावे लागणार आहे. पक्षातंर्गत सुरु असलेले वाद लवकरात लवकर मिटवून भाजपला कसे रोखता येईल, याबाबत जास्त विचार करावा लागणार, हे मात्र नक्की आहे.