आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती कोणाची खासगी संपत्ती नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी’ नाही, तर ते हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. शिवजयंती साजरी करून आम्ही त्याचे भांडवल करीत नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत शिवसेनेवर हल्ला चढवला. एवढेच नव्हे तर शिवजयंती साजरी करून नंतर हप्ते मागितले जातात, असा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
महालक्ष्मी रेसकोर्सवर ज्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती, त्याच ठिकाणी शनिवारी मोदींची मुंबईतील पहिली सभा झाली. परंतु शिवसेनेच्या सभेला जशी गर्दी आणि उत्साह होता त्या तुलनेत मोदींच्या सभेत उत्साह जाणवला नाही.
भाजपचे नेते शिवसेनेच्या आरोपांना कसे उत्तर देतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले होते. ‘भाजपने युती कायम ठेवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र युती ताेडण्यास शिवसेनाच जबाबदार आहे,’ असे सांगत तावडेंनी पहिला हल्ला चढवला. ‘छत्रपतींची साथ..’ या घोषणेवर शिवसेनेने भाजपवर टीका केली होती. त्याचा समाचार घेताना तावडे म्हणाले, ‘आम्हाला आताच छत्रपतींची आठवण झाली असे नाही. सुरतमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास विरोध होत असताना मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुतळा बसवून महाराजांप्रती प्रेम दाखवले होते,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
फडणवीस म्हणाले, ‘छत्रपतींचे नाव घेतल्यावर अनेकांच्या पोटात का दुखले ते समजले नाही. शिवाजी महाराज आमच्या रक्तात आहेत. छत्रपती ही कोणाची खासगी संपत्ती नाहीत, तर ते हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे. आम्हाला विचारतात की कधी शिवजयंती साजरी केली का? तर २००० मध्येच मोदी यांनी शिवनेरीवर जयंती साजरी केली होती. आम्ही त्याचे भांडवल केले नाही. महाराज मनात असावे लागतात. शिवजयंती साजरी करून त्यांचे वारसदार होता येत नाही,’ असा टोला त्यांनी लगावला. नितीन गडकरी यांनीही मोदी शिवभक्त असून सुरतमध्ये पुतळा बसवल्याचा उल्लेख केला आणि शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत असल्याचे सांगितले.

‘मुंबई म्हणजे "मिनी हिंदुस्थान' आहे. देशाचे भवितव्य मुंबईच घडवणार असून ‘आर्थिक राजधानी’ हा गतलौकिक परत मिळवावा लागेल. त्यामुळे अाता मुंबईकरांनीच ठरवावे की मुंबई आणि महाराष्ट्र कुणाच्या हाती सोपवावा.’
नरेंद्र मोदी, पंतप्रधान