आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिंतातुर चिंतू - कुणाला व्हायचंय आमदार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिंतूला पाहताच कुणी तरी म्हणालं, "या भाऊ, उशीर केला तुम्ही. टेन्शन आलं का काय तुम्हाला कॉमन पार्टीचं?' सगळा धुरळा खाली बसला. सोमवारपासून प्रचाराला भिडायचं असा विचार करून तिन्ही मतदारसंघांचे सगळे उमेदवार एकत्र आले. रविवारी पार्टी करूया असं ठरलं आणि एकमेकांना निरोप पाठवून जागा ठरवली. चिंतूला आमंत्रण होतंच. घरची कामं उरकून तो गावाबाहेरच्या ढाब्यावर गेला. बाहेर पोलिसांचीही गर्दी, निवडणूक आयोगाचे कॅमेरेवाले पण बाहेर सज्ज. आपण चुकून पत्रकार परिषदेला किंवा जाहीर सभेला आलो की काय असंच त्याला आधी वाटून गेलं. तो पोहोचतो अनेकांनी आपलं पुढारपण बाजूला ठेवत मोकळ्या ढाकळ्या गप्पा सुरू केल्या होत्या. चिंतूला पाहताच कुणी तरी म्हणालं, "या भाऊ, उशीर केला तुम्ही. टेन्शन आलं का काय तुम्हाला कॉमन पार्टीचं?' चिंतू म्हणाला, "नाही नाही. टेन्शन नाही; पण हे बाहेर पोलिस आणि कॅमेरेवाले काय करतायत?' एक म्हणाला, "आचारसंहितावाले आहेत. वाॅच ठेवताहेत.' त्यावर दुसरा म्हणाला, "यांचं फारच आहे राव. परवा अर्ज भरण्याआधी मी घरची रद्दी विकून येत होतो, तर रस्त्यात गाडी अडवली. त्या पैशांचाही हिशेब मागितला राव!' तिसरा म्हणाला, "आता रद्दी विकायची वेळ नाही येणार, अजून अर्ज मागं घ्यायला वेळ आहे. ठरवून घे बाबा काही तरी. दिवाळी झक्कास होईल.' चिंतू म्हणाला, "एका मतदारसंघात ५०-५० उमेदवार असल्यावर खऱ्या उमेदवारांची अडचण होणार ना राव. किती जणांना बसवायचं?' त्यावर आणखी एक उमेदवार म्हणाला, "चिंतूभाऊ या वेळी फक्त बसण्यातच फायदा नाही तर उभं राहण्यातही फायदा आहे. त्यावर चिंतूनं प्रश्नांकित चेहरा केला. तो उमेदवार म्हणाला, "मला स्वत:लाच पाच जणांकडून फोन येताहेत कालपासून. दोघं म्हणतात मागं घ्या, खुश करून टाकतो तुम्हाला, तर तिघं म्हणत होते, असू द्या राव काही बिघडत नाही. जेवढं तुम्ही चालताल तेवढा आमचा फायदा. उभं राहण्याचा आणि प्रचाराचा खर्च अाम्ही करतो. एवढंच काय लागले तर कार्यकर्ते पण देतो'. चिंतूला आता गरगरल्यासारखं व्हायला लागलं. त्यानं शेजारच्या उमेदवाराला विचारलं, "तुझी किती मतं आहेत रे बाबा मतदारसंघात?'. तो हसला, "चिंतूभाऊ, आमची गल्ली, पाहुणे, नातेवाईक, मित्र मिळून आकडा ५०० पर्यंत पोहोचतो' चिंतू उडालाच. म्हणाला, "अरे ५०० मतावर तू आमदार नाही होत'. उमेदवार म्हणाला, "कुणाला व्हायचंय आमदार? दसरा-दिवाळी निघते आणि महापालिका इलेक्शनचा पण अंदाज येऊन जातो. ट्रायल आहे बाबा..'