गांधीनगर (गुजरात)- विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल उद्यापासून (शनिवार) महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पटेल एकूण 6 प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. महाराष्ट्राच्या गुजराती उद्योजकांनी गुजरातमध्ये परतावे असे वक्तव्य पटेल यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून प्रहार केला होता. पटेल यांच्या प्रचार सभांवर मनसे आता कोणता पवित्रा घेते हे बघण्यासारखे असेल.
यासंदर्भात भाजपचे मीडिया सेल समन्वयक हर्षद पटेल यांनी माहिती देताना सांगितले, की मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल शनिवारी कर्जत, डहाणू आणि कांदिवली येथे प्रचार सभा घेणार आहेत. रविवारी अकोला, नाशिक आणि नवापुरा येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी त्या राज ठाकरे यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्याला उत्तर देणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात पायाभुत सुविधांचा अभाव आहे. गुजरातमध्ये चांगले रस्ते, व्यावसायासाठी पोषक वातावरण आणि इतर सुविधा असल्याने महाराष्ट्रातील गुजराती उद्योजकांनी गुजरातमध्ये परतावे, असे वक्तव्य आनंदीबेन पटेल यांनी केले होते. त्यावर राज ठाकरे यांनी घणाघाती प्रहार केला होता. प्रत्येक प्रचार सभेत आणि मुलाखतीत राज ठाकरे हे आनंदीबेन यांचा उल्लेख करीत आले आहेत. त्यामुळे पटेल यांच्या प्रचार सभा सुरू झाल्यानंतर मनसे कोणता पवित्रा घेणार हे बघण्यासारखे ठरणार आहे.