आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • College Friend Face To Face In Vidhansabha Election News In Divya Marathi

कॉलेज कॅम्पसमधील संघर्ष विधानसभेच्या आखाड्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - एकेकाळी विद्यार्थी संसदेच्या निवडणुका गाजवलेले आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर विधानसभा निवडणुकांच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गत निवडणुकीत सेनेने खोतकर यांना घनसावंगी मतदारसंघात पाठवले होते, त्यामुळे दोघांमधील लढतीचा सिलसिला खंडित झाला होता. मात्र या वेळेला खोतकर जालन्यातून सेनेचे उमेदवार असल्याने या दोघांमध्ये पुन्हा एकदा कांटे की टक्कर रंगणार आहे.

महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संसदेच्या सचिवपदासाठी जेव्हा निवडणुका घेतल्या जात, तेव्हा गोरंट्याल आणि खोतकर हे जेईएस कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांनीही या निवडणुकांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होत नेतृत्वगुण विकसित केले. काही वर्षांतच कॉलेज कॅम्पसमधील हा संघर्ष विधानसभेच्या आखाड्यापर्यंत येऊन पोहोचला. या दोघांमध्ये विधानसभेची पहिली लढत १९९९ मध्ये झाली. अर्थात, गोरंट्याल काँग्रेसचे तर खोतकर शिवसेनेचे उमेदवार होते. या निवडणुकीत गोरंट्याल यांना ६५ हजार, तर खोतकर यांना ६१ हजार मते मिळाली. अगदी थोडक्यात पराभव झाल्याने खोतकर यांनी पुन्हा जोमाने तयारी केली. २००४ च्या निवडणुकीत खोतकर यांना ८६ हजार मते मिळाली, तर गोरंट्याल यांना ७० हजार मतांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, २००९ ला मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली. यात घनसावंगी हा नवीन मतदारसंघ तयार झाला. त्यामुळे शिवसेनेने खोतकर जालन्यातून आमदार असतानाही त्यांना घनसावंगीतून निवडणूक लढवण्यासाठी पाठवले, त्यामुळे खोतकर विरुद्ध गोरंट्याल यांच्यातील लढतीचा सिलसिला खंडित झाला. दरम्यान, या वर्षी खोतकर पुन्हा जालन्यातून सेनेचे उमेदवार आहेत. त्यामुळे जालनेकरांना पुन्हा या दोघांमधील लढतीचे अनुभव घेता येणार आहे.