बारामती - बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सोमवारी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे रविवारी अजित पवार शेतकरी मेळाव्यासाठी आले होते.
तोट्यात गेलेल्या या कारखान्याच्या पेट्रोल पंपावरून त्यांनी राजकीय पक्षांच्या वाहनांना मोफत इंधनाची सोय केली होती. तसेच सायंबाचीवाडी येथील शासकीय ठेकेदाराच्या घरी पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसवमेत बैठक घेऊन मतदारांसाठी जेवणावळीचा कार्यक्रम घेतला. काही सरकारी अधिकारीही त्यांच्या दिमतीला होते, अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते दिलीप खैरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, या तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असे निवडणूक अधिकारी संतोष जाधव यांनी सांगितले.
दादांची दमदाटी राज्याला माहीत
अजितपवार हे राजकारणात बडे प्रस्थ असल्याने प्रशासनावर त्यांचा नेहमी वचक राहतो. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, तरी कायदेशीर कारवाई होत नाही. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून या राज्यात कायद्याचे राज्य आहे की, मस्तवाल सत्ताधाऱ्यांचे असा प्रश्न पडतो. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दिलीपखैरे, तक्रारदार.