आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभवानंतरही काँग्रेसमध्ये पाय ओढाओढी, प्रिया दत्त आज सोनिया गांधींना भेटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतरही काँग्रेसमधील गटबाजी अजून थांबलेली नाही. आपल्या पराभवाला मोदी लाटेपेक्षा पक्षातील नेते, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान आमदार कृपाशंकर सिंह हेच कारणीभूत असल्याचा ठपका माजी खासदार प्रिया दत्त यांनी ठेवला आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी त्यांनी थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून या दोघांनाही विधानसभेचे तिकीट देऊ नये, अशी मागणी केली आहे.

२००९च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ पैकी १७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. मात्र, पाच वर्षांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व पाचही खासदारांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस आघाडीविरोधात लोकांमध्ये असलेली प्रचंड नाराजी लक्षात घेता काँग्रेसला विधानसभेच्या १७ जागा राखणे जवळपास अशक्य आहे. त्यातच पराभूत खासदारांनी लोकसभेतील हिशेब चुकते करायला घेतल्याने काँग्रेसच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

विधानसभेत प्रचाराला नकार
चांदिवलीचे काँग्रेसचे आमदार नसीम खान तसेच कलिनाचे आमदार कृपाशंकर यांनी प्रिया दत्त यांना लोकसभेत प्रचार करण्यास नकार दिला होता. प्रियांचे नेतृत्व मानण्यास नकार देत नसीम कृपाशंकर यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. शेवटी मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करत या दोघांची समजूत काढावी लागली. अखेरच्या क्षणी हे दोन्ही आमदार तयार झाले, तरी काँग्रेसचे बालेकिल्ले समजले जाणाऱ्या चांदिवली तसेच कलिनामधून प्रिया दत्त यांना अपेक्षित मतदान झाले नव्हते. याचा राग त्यांच्या मनातून अजूनही गेलेला नाही.

इतर इच्छुक सरसावले
नसीम खान कृपाशंकर यांचे तिकीट कापण्याचे प्रयत्न सुरू असताना चांदिवलीमधून एस. अण्णा मलई किंवा झाहिर अहमद, तर कलिनात धर्मेश व्यास रतनेश सिंग यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कृष्णा हेगडे, शेट्टींचा पत्ता कटणार
जगन्नाथ शेट्टी (सायन कोळीवाडा), अॅनी शेखर (कुलाबा), कृष्णा हेगडे (विलेपार्ले) या तीन आमदारांना या वेळी काँग्रेसचे तिकीट मिळणार नाही, अशी दाट शक्यता आहे. शेट्टी सतत आजारी असल्याने त्यांच्याऐवजी वीरेंद्र उपाध्याय, गणेश यादव, उपेंद्र जोशी यांना जागा मिळण्याची शक्यता आहे, तर अॅनी शेखर यांना अपेक्षित कामगिरी करता आल्याने त्यांच्या जागी भाई जगताप किंवा ज्ञानराज निकम यांना संधी मिळेल, असे बोलले जाते. कृष्णा हेगडे तसेच वर्सोवाचे आमदार बलदेव खोसा यांनाही आपला प्रभाव पाडता आल्याने दोघांनाही पुन्हा तिकीट मिळणार नाही, असे संकेत पक्षातील सूत्रांनी दिले आहेत.