आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress Leader Vilas Undalkar Comment On Pruthviraj Chavan News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीचे पार्सल परत पाठवूया, विलास उंडाळकरांची चव्हाणांवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातारा- ‘मुख्यमंत्री हे दिल्लीचे पार्सल आहेत, त्यांना दिल्लीला परत पाठवलेच पाहिजे. आपल्या कारकीर्दीत त्यांनी जनतेला तर फसवलेच, मात्र काँग्रेस पक्षाचीही फसवणूक केली. आता त्यांना घरी बसवलेच पाहिजे,’ अशी टीका दक्षिण कराडमधील मावळते आमदार व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका उंडाळकर यांनी रविवारी जाहीर सभेत पृथ्वीराज चव्हाणांवर केली.

दक्षिण कराडमधील विद्यमान आमदार उंडाळकर यांचे तिकीट कापून काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. चव्हाण व उंडाळकरांमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. आपल्याला डावलल्यामुळे नाराज झालेल्या उंडाळकरांनी आता अपक्ष उमेदवारी दाखल करत चव्हाणांना आव्हान दिले आहे. रविवारी कराडमधील सभेत ते म्हणाले की, मुख्यमंत्री राज्याचा, सातारा जिल्ह्याचा विकास केला असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांनी कधी, कुठे, कोणाचा व कसा विकास केला हा खरे तर संशोधनाचाच विषय आहे. त्यांच्या वेळखाऊ धोरणामुळेच काँग्रेस पक्ष संपत आला आहे. त्यांनी मला उमेदवारी मिळण्यात आडकाठी आणली, मतदारसंघात माझे चिन्ह पळवले. मात्र मला जनतेतून संपवता येणार नाही हे समजल्यावर चव्हाणांनी माझ्यावर वैयक्तिक पातळीवर आरोप सुरू केले. काँग्रेस पक्ष व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आत येथील जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धारही उंडाळकरांनी बोलून दाखवला.

ही लढाई तुमचीच
‘विकासाऐवजी खच्चीकरण करणारा आणि केवळ आपल्याच समर्थकांचे भले पाहणारा मुख्यमंत्री माझ्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत आजपर्यंत मी पाहिलेला नाही. माझ्यावर ते दबाव टाकू शकत नाहीत. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या प्रेमापोटी मी पुन्हा या निवडणुकीत उभा आहे. आता ही निवडणूक माझ्या एकट्याची राहिलेली नाही तर ती जनतेची झाली आहे. आता तुम्हीच ही निवडणूक लढवा व चव्हाणांना घरी बसवा,’ असे भावनिक उद‌्गारही उंडाळकरांनी काढले.