रामटेक - छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे नाव सर्वच घेत आहे. त्यांची स्मारके उभे करण्याची घोषणा केली जात आहे. पंतप्रधान मोदींचा उल्लेख टाळून राहुल गांधी म्हणाले, गुजरातमध्ये सरदार पटेलांचे स्मारक उभारण्याची घोषणा जे करत आहेत, ते आयुष्यभर त्यांच्या विचारांच्या विरोधात वागत आले आहेत, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रामटेक येथील सभेत केली. रामटेक येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'दोन ऑक्टबरला त्यांनी महात्मा गांधीच्या समाधीचे दर्शन घेतले. पण त्यांचे विचार ते आत्मसात करु शकलेले नाहीत.' महात्मा गांधी, सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने फक्त काँग्रेस चालत असल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्षांनी यावेळी केला.
महाराष्ट्र अव्वल
पंतप्रधान
नरेंद्र मोदी महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेऊन जाण्याचा दावा करत आहेत, तो फोल असल्याचा सांगत राहुल गांधी यांनी महाराष्ट्र प्रथमपासून देशात अव्वल असल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदी म्हणतात गेल्या साठ वर्षांमध्ये येथे काहीच झाले नाही. त्यांचे हे वक्तव्य तुमच्या आणि तुमच्या माता-पित्यांच्या श्रमावर प्रश्न उपस्थित करणारे आहे.' महाराष्ट्र आणि मुंबईचे आज देशात नाव आहे, त्यामागे येथील अनेक पिढ्यांचे कष्ट आहेत. महाराष्ट्र हे राज्य नेहमी देशात अव्वल राहीलेले आहे.
मोदी सरकारच्या धोरणांवर टीका
केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकार गोरगरीबांच्या हिताचे कायदे रद्द करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. मोदींच्या अमेरिका दौर्यामागे तेथील औषध कंपन्यांचे भले करणे एवढाच उद्देश असल्याचे राहुल यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्यानंतर कॅन्सर, मधुमेह या सारख्या दुर्धर आजारांवरील औषधांच्या किंमती लाखो रुपयांनी वाढल्या आहेत. राज्यात काँग्रेसचे सरकार आले तर, जनतेला मोफत वैद्यकीय सुविधा देण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले.
बोलणे सोपे असते, करणे अवघड
पंतप्रधान लोकसभेच्या निवडणूकीत सांगत होते, मी पंतप्रधान झालो तर चीन आणि पाकिस्तानला धडा शिकवेल. पण सध्या देशात जे सुरु आहे, ते तुम्ही पाहात आहात. चीनचे राष्ट्राध्यक्ष भारतात आले तेव्हा त्यांचे सैन्य लडाखमध्ये घुसखोरी करत होते. पाकिस्तान रोज
आपल्या जवानांवर हल्ले करत आहे. त्यावर आपले पंतप्रधान आता म्हणत आहेत, की लवकरच सर्वकाही ठिक होईल. बोलणे सोपे असते, काम करणे आवघड असते, असा टोला त्यांनी हाणला.