औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्रमोदी यांनी मतदानानंतर काढलेली सेल्फी अनेक दिवस चर्चेत होती. पुढे या प्रकरणाचे काय झाले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झालेला हा ट्रेड उद्या राज्यातही मोठ्या प्रमाणावर दिसून येणार हे निश्चित आहे. अनेक वाहिन्या, संकेतस्थळांवर खास या सेल्फी दाखवले जातात.
Selfie हे आजच्या आधुनिक काळात तरुणाईचे व्यक्त होण्याचे एक माध्यम आहे. एखादे सेलिब्रेशन असो, काही घोषणा करायची असो किंवा कोणतीही भावना करायची असो. सोबत कोणी नसले तरी तरुणाई या माध्यमातून व्यक्त होणे विसरत नाही. हेच लक्षात घेऊन यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी या सेल्फीचा वापर करून घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक वाहिन्यांनी मतदारांना मतदानानंतर
आपले सेल्फी वाहिनीला पाठवण्याचे आवाहन केले होते. हे सेल्फी त्यांनी वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान दाखवलेही. त्याचप्रमाणे काही संकेतस्थळांनीही तशा प्रकारची सोय उपलब्ध करून दिली होती. तरुणांनी आपले सेल्फी टिव्हीवर किंवा याठिकाणी झळकण्यासाठी मतदानाचा आग्रह धरणे हा त्यामागचा उद्देश होता. याला मोठा प्रतिसादही मिळाला.
लोकसभेचा अनुभव पाहता विधानसभेतही तरुणांचा मतदानासाठीचा उत्साह वाढवण्यासाठी अशी सुरुवात करण्यात आली आहे. अनेक वाहिन्या सेल्फी पाठवण्याचे आवाहन करत आहेत. उद्या सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर जसजसे सेल्फी येतील तसे ते सर्वांसमोर आणले जाईल. त्यामुळे या सेल्फीच्या माध्यमातून मतदानाप्रक्रियेला एका उत्सवाचे रुप मिळणार हे नक्की.