'सत्ताधारी जमात बना!' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील मागसलेल्या घटकाला सांगितले होते. मात्र, त्यांच्या हयातीनंतर स्थापन झालेला रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून राज्यात प्रमुख विरोधीपक्ष देखील बनू शकलेला नाही ही वस्तूस्थिती आहे. त्याचवेळी बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरीत होऊन, कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आणि उत्तर प्रदेशात एक नव्हे तर दोन वेळा सत्ता स्थापन केली. त्यांच्यानंतर मायावती यांनी पक्षाची धुरा
आपल्या खांद्यावर घेतली आणि संसदीय राजकारणात आपले आस्तित्व टिकवून ठेवले आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी राहिलेल्या पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्रात याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. येथील रिपब्लिकन पक्षाचे छोटे-मोठे 50 हून अधिक गट आहे. त्यापैकी एकाही पक्षाला स्वतःचे चिन्ह नाही, एवढी दारूण परिस्थिती आहे. यांची अवस्था कोणाचा पायपोस कोणाला नाही अशी झाली आहे.
जनरेट्यामुळे रिपब्लिकन पक्ष अनेकदा एकत्र आले, मात्र ते फारकाळ एकत्र राहू शकलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तत्कालिन सर्व नेत्यांनी चैत्यभूमीवर एकत्र राहाण्याच्या आणाभाका घेतल्या. नेत्यांच्या वैयक्तिक महात्वाकांक्षामुळे हे एक्य कधीही शेवटास गेलेल नाही. शेवटचे एक्य झाले ते 1999 मध्ये. त्याचा सर्वात मोठा दृष्य परिणाम असा राहिला की, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, रा.सू.गवई आणि जोगेंद्र कवाडे हे चारही प्रमुख नेते लोकसभेवर निवडून गेले. या ऐक्याचा फायदा काँग्रेसलाही मोठ्या प्रमाणात झाला, राज्यात त्यांच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ झाली. मात्र, हे ऐक्यही फारकाळ टीकू शकले नाही. देशात कोणत्याच पक्षात नसलेली अध्यक्षीय पद्धत (प्रेसिडिंशिअल) त्यावेळी नेत्यांनी स्विकारली होती. तरीही हे ऐक्य टीकू शकले नाही. त्यानंतर हे नेते जे वेगळे झाले ते स्वतःच्या सुभेदार्या सांभाळण्यातच मग्न आहेत. त्यातल्या त्यात प्रकाश आंबेडकर यांनी भारिपला बहुजन महासंघाची जोड देऊन 'भारिप बहुजन महासंघ' या पक्षाचे प्रयोग अकोल्यात राबवण्यास सुरवात केली. येथे त्यांनी जिल्हा परिषद, चार ते पाच पंचायत समित्या, महानगर पालिका स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे. त्याशिवाय अकोल्यातून दोन ते तीन आमदार ते स्वबळावर निवडून आणतात हे त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगचे यश आहे. रामदास आठवले यांच्या राजकारणात गांभीर्य राहिले नसल्याचे जाणवत आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, विधानसभा 2014 कोण किती जागा लढवत आहे