आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट मंत्र्यांनी राज्याला कर्जाच्या खाईत लोटले; देवेंद्र फडणवीस यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - राज्यातीलआघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत विकासाच्या नावाखाली राज्यावर तीन लाख कोटींचे आणि राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीवर २७ हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा चढवला. तर मंत्र्यांनी स्वत:च्या तिजोऱ्या भरल्या. या निवडणुकीत त्यांना योग्य जागा दाखवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंगळवारी दुपारी येथील टिळक स्मारक मंदिराच्या मैदानावर भाजप मित्रपक्षांच्या महायुतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की राज्यातील आघाडी शासनाच्या मंत्र्यांनी ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. या मंत्र्यांनी सिंचनाच्या नावाखाली ७० हजार कोटी रुपये कागदावरच खर्ची दाखवले. स्वत:च्या तिजोऱ्या भरणाऱ्या या मंत्र्यांना शेतकरीहिताचे सोयरसूतक नाही. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या अवस्थेकडे लक्ष वेधत फडणवीस यांनी इथल्या आमदाराने काय केले, असा सवाल केला. सध्या ते मंगळवेढ्याच्या ३५ गावांसाठी सिंचन योजनेला मंजुरी मिळवल्याची टिमकी वाजवत आहेत. मात्र नुसत्या पत्राने पाणी मिळत नाही, त्यासाठी निधीची आवश्यकता असते. सध्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. सुमारे साडेपाचशे कोटींच्या या योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळू शकते. त्यासाठी महायुतीचा उमेदवार निवडून यायला हवा, असे त्यांनी म्हटले.
गंगेच्या धर्तीवर चंद्रभागेची स्वच्छता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या स्वच्छतेचा संकल्प केला आहे. त्या धर्तीवर लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र प्रकल्प राबवू. त्यासाठी केंद्राकडून निधी मिळवू, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितले.
धनगर समाजाला आरक्षण देतानाच हात का आखडले
मोहोळ
- आरक्षणप्रश्नीभाजप मराठा समाजाच्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळे काँग्रेस आघाडीला केवळ मतांसाठी त्यांना आरक्षण द्यावे लागले. मात्र, धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी या सरकारने का हात आखडता घेतला, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मंगळवारी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय क्षीरसागर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची वाट लावली. भ्रष्टाचारी आणि मनमानी वृत्तीमुळे सिंचन योजना रखडल्या. मात्र, आम्ही संजय क्षीरसागर यांच्या मसले चौधरी येथे होणाऱ्या साखर कारखान्यासाठी सर्वतोपरी मदत करू.
पंढरपूर : येथील टिळक स्मारक मैदानावर भाजप आणि घटक पक्षांच्या महायुतीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रशांत परिचारक यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर सभा घेतली. यामध्ये मार्गदर्शन करताना श्री. फडणवीस. दुसऱ्या छायाचित्रात सभेसाठी झालेली प्रचंड गर्दी. (छायाचित्रे :राजू बाबर)