आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जि.प. व मनपातील समीकरणे बदलणार बिघाडीमुळे सर्वच राजकीय पक्ष संभ्रमात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करून काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली. पण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसची फारकत झाल्यामुळे त्याचा जिल्हा परिषदेत काय परिणाम होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 4 ऑक्टोबरला होणा-या सभापती निवडीत बंडाळी होण्याची शक्यता आहे. तशी मोर्चेबांधणी असंतुष्टांनी केली आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळावर लढवली होती. दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजूला करून भाजप व शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले होते. अडीच वर्षे काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेत होती. पण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील अडीच वर्षांसाठी 21सप्टेंबर रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीत दोन्ही काँग्रेसने एकमेकांशी जुळवून घेतले. राष्ट्रवादीकडे सर्वाधिक जागा असल्याने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले.
विधानसभेच्या जागावाटपावरून युती पाठोपाठ काँग्रेस आघाडीचेही बिनसल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवार (28 सप्टेंबर) ही शेवटची मुदत आहे. तत्पूर्वी उमेदवार जाहीर करताना सर्वच पक्षांची दमछाक झाली आहे. प्रचाराच्या तोफा धडाडत असताना या पक्षांमधील संघर्ष शिगेला पोहोचणार आहे. त्यामुळे याचा परिणाम जिल्हा परिषदेतील आघाडीवरही होईल, का असा सवाल दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. पण यासंदर्भात पक्षश्रेष्ठी फारसे भाष्य करत नाहीत. स्थानिक पातळीवर जवळचा लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद सदस्याकडे पाहिले जाते. त्यानुसार विधानसभा प्रचाराच्या व्यासपीठावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसतील. एकीकडे जिल्हा परिषदेत आघाडी करायची आणि विधानसभेत आरोप-प्रत्यारोप करायचे, ही बाब निष्ठावंतांच्या पचनी पडत नसल्याने अडचण वाढणार आहे.
चार विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी येत्या 4 ऑक्टोबरला होणार आहेत. या निवडीच्यावेळी राज्यात झालेल्या फारकतीचे पडसाद पहायला मिळण्याची शक्यता आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या सदस्यांची निराशा झाल्याने या असंतुष्टांनी वेगळीच चूल मांडण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये पाचपुते, मुरकुटे यांच्यासह लामखडे गटाचाही समावेश आहे.
परिणाम होणार नाही
जिल्हा परिषद, तसेच महापालिकेत स्थानिक पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. राज्य पातळीवर दोन्ही काँग्रेस स्वबळावर लढणार असल्या, तरी त्याचा कोणताही परिणाम येथील स्थानिक आघाड्यांवर होणार नाही. जिल्हा परिषदेच्या विषय समित्याच्या सभापती निवडीवरही त्याचा परिणाम दिसणार नाही. पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी.