आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वबळावर लढण्यास भाजपकडे २८८ उमेदवार आहेतच कुठे? - एकनाथ खडसे यांची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उत्तर महाराष्ट्राला यंदा मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठीच मी मते मागणार आहे, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. याचाच अर्थ खडसेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा कायम ठेवला आहे. स्वबळावर लढल्यास सर्वच मतदारसंघासाठी भाजपकडे उमेदवार नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.
मुंबईत युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर खडसे बुधवारी जळगावात दाखल झाले. पत्रकारांशी गप्पा मारताना ते म्हणाले की, युती व्हावी, असाच माझा आग्रह राहिला आहे. सद्य:स्थितीत राज्यात संपूर्ण २८८ जागा लढण्यासाठी भाजपकडे उमेदवार नाही. त्यामुळे आमची जिथे ताकद आहे, त्याच जागांवर आम्ही जोर लावणार आहोत. गेल्या २५ वर्षांत शिवसेनेचे जेथे उमेदवार निवडूनच आले नाहीत; ते मतदारसंघ आम्ही बदलवून मागत आहोत. ज्यांच्या जागा अधिक त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद हे युतीचे सूत्र आधीच ठरले आहे. जिथे भाजपची ताकद आहे आणि शिवसेनेचे उमेदवार पराभूत होत आले आहेत, त्या जागा भाजपने मागितल्या आहेत. त्यात काहीही वावगे नसल्याचे खडसे म्हणाले.

भुसावळ भाजपकडेच
भुसावळमध्ये२५ वर्षांपासून शिवसेनेचा उमेदवार पराभूत होत आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सोडण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय सावकारे यांनी नुकताच भाजपत प्रवेश केला आहे. ही जागा भाजपला सोडण्याचे निश्चित झाल्यानंतरच सावकारेंनी प्रवेश केला. आजही अनेक आमदार भाजप प्रवेशाच्या वाटेवर आहेत, पण त्यांची जागा निश्चित होऊ शकत नाही म्हणून त्यांना प्रवेश दिलेला नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले.

राज्याचा दौरा करणार
माझ्याविरोधातकोणताही उमेदवार दिला तरी मला काहीही फरक पडत नाही. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे मी निवडून येणारच आहे. युती झाली तर युतीच्या उमेदवारांना आणि नाही झाली तर भाजपला एकहाती सत्ता देण्यासाठी आपण महाराष्ट्रभर प्रचार करणार आहोत, असेही खडसेंनी स्पष्ट केले.