पितृपक्ष संपला. सर्वपित्री सरली. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात आता उत्साही वातावरण पाहायला मिळेल, जागावाटपाचा पेच सुटेल या आशेवर जगणाऱ्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला. कारण महायुतीतल्या घटक पक्षांची दिवसभर पळापळ आणि आघाडीच्या नेत्यांचे सूचक मौन यामुळे घटस्थापनेच्या दिवशी आई अंबाबाईच्या या राज्यात चांगलाच राजकीय गोंधळ उडाला. दिवसभर पळापळीमुळे वैतागलेल्या समाजभूषण महादेवबप्पांना छानशी डुलकी लागली होती. तेवढ्यात त्यांचा फोन खणखणला. पलीकडून आवाज आला,
‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली, जागावाटपाची चर्चा पुन्हा सांडली... बप्पांनी लगेच ओळखलं. हे तर काव्याचार्य रामदासभाऊ.
‘बोला कविराज, काय म्हणता?’
‘कायच कळंना झालंय, काय करावं सुचंना झालंय, कोणीकडं जावं समजंना झालंय...’
‘अरे, तुम्हाला झालंय तरी काय? राहू वाटलं राहा त्यांच्याबरूबर, नायतर
आपलं घर मांडा स्वतंत्र. कोण अडवतंय तुम्हास्नी?’
‘तसं नाय बप्पा, लय दिसात असं स्वबळावर उभं नाय ना म्हणून प्राब्लेम हाय.’
‘मग तुमच्या जुन्या घड्याळवाल्या मित्राला लावा की फोन! दोन-चार शीघ्रकविता सुनवा त्यांना, म्हणजी त्ये बी ठिकाणावर येतील अन् तुमी बी.. ठेवतू आता...’
महादेवबप्पांनी दिलेल्या सल्ल्याने काव्याचार्यांच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.
घड्याळकार पुलोदस्वामी काकांची भेट घेण्यासाठी काव्याचार्य बारामतीला दाखल झाले. तेथे वेगळाच गोंधळ सुरू होता. ‘हात’करांनी परस्परच यादी जाहीर केल्याने दादांसह काकांचीही सटकली होती. दादा ओरडून सांगत होते, तर काका मात्र एक शब्दही बोलता तक्क्याला रेलून आरामात बसले होते. सा. बां. सरदारांनी काव्याचार्य आल्याची वर्दी पुलोदस्वामींना दिली. तसा काकांचा चेहरा खुलला. ते म्हणाले, ‘या काव्याचार्य, आज कशी काय वाट चुकली म्हणायची तुमची?’
‘तिकडं माझी लय आबाळ होती हे तुम्ही जाणताच.’
‘मग इकडं या की, कोण आडवतंय तुम्हाला? पण.. काकांनी पेच टाकला.
या पण..ने रामदासभाऊंच्या कपाळावरच्या अठ्यांचे जाळे वाढले.
‘आरामात बसून लढू, तुमचं मंत्रिपद नक्की समजायचं, पण सोबत सर्व जागी हात, कमळ बाणाला त्रास देणारे उमेदवार उभे करायचे.’ काकांनी पेच सोडला.
तसे रामदासभाऊ म्हणाले, ‘अवो, एवढी माणसं असती तर कशाला एवढी पळापळ करून घेतली असती मी जिवाची. मीच नसतो का गोंधळ घालीत बसलो असतो जागावाटपाचा...
-