आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hon. Mr. Clean ChiefMinister Prithviraj Chavan Life Story In Marathi

नगरपालिका शाळा ते कॅलिफोर्निया विद्यापीठ, जाणून घ्या मि. क्लिनची खासगी LIFE

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची एक मुद्रा)

महाराष्ट्रात नुकताच निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सर्वत्र निवडणुकीची धावपळ सुरू आहे. आघाडी असो वा महायुती दोघांमध्ये जागावाटपावरून युद्ध पेटले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे विद्यमान मि. क्लिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या धावपळीतही संयमाने वावरताना दिसताहेत. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसमधील असे एक व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्यावर कसलेच आरोप नाहीत की, भ्रष्टाचाराची केसही नाही. म्हणूनच तर त्यांना मि. क्लिन अशी उपाधी देण्यात आली आहे.
२०१० मध्ये आदर्श घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाती आली. चव्हाणांनीही या पदाला योग्य न्याय देत महाराष्ट्रात अनेक विकासात्मक कामे केली. चव्हाण यांच्यावर विरोधी पक्ष विनोद करतात मात्र, त्यांच्यावर कोणतेही दोषारोप करणे त्यांना शक्य झाले नाही. असे हे स्वच्छ चारित्र्य असलेले मुख्यमंत्री त्यांच्या खासगी जीवनातही अत्यंत साधेपणाने वावरताना दिसतात.
पृ्थीराज चव्हाण यांचा जन्म १८ मार्च १९४६ ला मध्यप्रदेशच्या इंदौर जिल्ह्यात झाला. राजकीय कुटुंबात जन्मलेले चव्हाण हे वडील आनंदराव उर्फ दाजीसाहेब चव्हाण आणि आई प्रेमलताताई चव्हाण यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांना निरूपमा अजितराव यादव-देशमुख आणि विद्युलता व्यंकटराव घोरपडे अशा दोन लहान बहिणी आहेत. वडिल दाजीसाहेब चव्हाण हे कराडचे खासदार होते. १९५७ ते ७३ या काळात त्यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्यासमवेत काम केले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रेमलताताई यांनी त्यांची जागा लढवली आणि विजयी झाल्या. आई वडिल दोघेही राजकारणात असल्यामुळे राजकारणातील बाळकडू त्यांना लहानपासूनच मिळाले.
कर्‍हाडच्या नगरपालिकेच्या शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या चव्हाणांचे पुढील शिक्षण देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर चव्हाण यांनी बिट्स पिलानी येथून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. १९६७ मध्ये चव्हाण यांना युनेस्को, जर्मनीची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते मास्टर ऑफ सायन्स (एमएस) ची पदवी घेण्यासाठी संयुक्त अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी कॉम्प्यूटर सायन्स, इंजिनिअरिंग डिझाईनिंग या विषयांवर विविध लेख लिहिले. तसेच कॉम्प्यूटरायझेशन या विषयात संशोधन केले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतच डिझाईन इंजिनिअरींग या पदावर नोकरीही केली. तसेच डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, अँटी सबमरीन वेलफेअर आणि कॉम्प्यूटर स्टोरेज इत्यादी क्षेत्रातही त्यांनी काम केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीचे नाव सत्वशिला असून त्यांना अंकिता आणि जय अशी दोन मुले आहेत. यापैकी अंकिताचे 11 नोव्हेंबर २०१३ ला दिल्लीमध्ये लग्न झाले.
अमेरिकेत काही वर्षे काम केल्यनंतर पृथ्वीराज चव्हाण मायभूमीत परतले. भारतात त्यांनी एअरोनॉटिकल या क्षेत्रात नोकरी करण्यास सुरूवात केली. चव्हाण यांनी १९९१ मध्ये राजकारणात प्रवेश केला. कर्‍हाडच्या युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिंदूराव सखाराम जगताप यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या स्व. मातोश्रींच्या जागेवरून निवडणूक लढण्यास सांगितले आणि ते विजयीही झाले. याच ठिकाणावरून चव्हाणांनी हॅटट्रिक करत १९९१, १९९६, १९९८ या सर्वच निवडणुका जिंकल्या.
यानंतर राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार संभाळला. केंद्रीय मंत्री मंडळात राज्यमंत्री या पदावर त्यांनी समर्थपणे कार्यभार पाहिला. विज्ञान - तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यावेळी महत्त्वाची भूमिका साकारली होती. तसेच विविध विदेश दौर्‍यांमध्ये चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलँड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांना भेटी दिल्या आहेत.
पाहा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची दुर्मिळ आणि कधी न पाहिलेली छायाचित्रे...