आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागावाटपाचं गुऱ्हाळ - भाग 3

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृषिभूषण, जाणते राजे पुलोदस्वामी साहेबांनी श्री महालक्ष्मीच्या साक्षीने प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर करवीरनगरीत पंचगंगेच्या किनारी उसाच्या फडात भर दुपारी घड्याळवाल्या दिग्गजांची मैफल रंगली होती. जागावाटपाच्या गुऱ्हाळाच्या कल्हईत १४४ की २८८ या स्वतंत्र बळाच्या रसाला उकळी फुटत होती. सिंचनकार फटकळबाज धरणमित्र दादा, छमछमबंदीकार ‘हादसा’फेम आबा, मफरलप्रिय सा. बां. सरदार छगनभाऊ, ग्रामभूषण जयंतमामा, पाटबंधारेविभूषण ताज्या दमाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलराव इतर खाशी मंडळी गुऱ्हाळाच्या रसाचा आस्वाद घेत मस्त आंब्याच्या सावलीखाली बसलेली...
पाटबंधारेविभूषण प्रदेशाध्यक्षांनी राज्याचा हिशेब सिंचनकार दादांच्या कानी घातला. तसे आबा, जयंतमामा सावरून बसले. छगनरावांनी मफलर ठीकठाक केली.
दादा म्हणाले, ‘मी म्हणतो, काय गरज आहे त्या ठिकाणी आघाडीची?’
‘आमचंही तेच म्हणणं आहे,’ जयंतमामा, छगनरावांनी दादांच्या सुरात सूर मिसळला.
‘मोठ्या निवडणुकांत अशा छोट्या आघाड्या व्हायच्याच,’ आबांनी बार टाकला. त्यावर पाटबंधारेभूषण सुनीलराव म्हणाले, ‘हातवाल्यांनी चलाखी केली. परस्परच स्वतंत्र लढायची तयारी केली आहे. मुलाखती बी घेतल्या.’ तसे सिंचनकार दादांचा पारा एकदमच चढला, ते गरम झाले आणि ओरडले...‘आता माझी सटकली... मला राग येतोय..’ दादा रागाने थरथरू लागले, ओरडून लागले...माझी सटकली.. माझी सटकली.
पलीकडच्या आंब्याच्या सावलीत वामकुक्षी घेणाऱ्या पुलोदस्वामी साहेबांची या आरडाओरडीने झोपमोड झाली. ते उठले. त्यांनी बारीक नजरने सारा वेध घेतला सरदारांवर डाफरले, ‘काय चाललंय रे तिकडे.. ?’
तसे दादांसह सारे शिलेदार साहेबांभोवती जमा झाले.
‘कोणाची सटकली?’ साहेबांनी विचारले. ‘दादांची’ आबांनी माहिती दिली.
‘काय झालं रे आताच सटकायला? लेका, निवडणुकीत मतदारांची सटकली तर... काय होईल?..जरा सबुरीनं घ्या.. पहिले दिवस राहिले नाहीत आता लेकांनो..’
तेवढ्यात दादांचा फोन खणखणला. दादांनी फोन कानी लावला..‘बोला..काय.. कधी.. सांगतो निरोप साहेबांना...’
‘काय रे कोणाचा फोन?’ साहेबांनी विचारले.
‘माणकोजीरावांचा, हातवाल्यांनी आवतण दिलंय. मॅडमनी बोलावलंय जागावाटपाच्या चर्चेला..’
हे ऐकताच पुलोदस्वामी साहेबांचा चेहरा खुलला, ते उत्साहाने म्हणाले..‘चला गाडी काढा.. या हातवाल्यांच्या चर्चेने माझी सटकायची वेळ आलीय...’ तेवढ्यात घड्याळाचा गजर झाला.. सारे खुश झाले. गाडीत बसताना साहेबांनी दादांना जवळ बोलावले अन् म्हणाले, ‘अरे, तो खंजीर ठेवला का गाडीत? धार लावली का त्याला?