आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशात यंदा बदलाचे वारे!, जैन, देवकर औत्सूक्याचा विषय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभा निवडणुकीत लाटेवर स्वार होणारी खान्देशातील जनता विधानसभा निवडणुकीत मात्र पसंतीचाच उमेदवार निवडून देत आली आहे. या निवडणुकीत जात, धर्म, पंथ, पैसा पगडा हे समीकरणही प्रभावी ठरत आली आहे. मतदारांना गृहीत धरणार्‍यांना धडा शिकवण्याचे कामही खान्देशवासीयांनी वेळोवेळी केले आहे. जसे गेल्या निवडणुकीत रोहिदास पाटील धुळे ग्रामीण, सुरूपसिंग नाईक यांना नवापूर, राजवर्धन कदमबांडे यांना धुळ्यातून धूळ चारली होती. १९९५ पर्यंत राज्यात होते तसेच चित्रं खान्देशातही होते. काही मतदारसंघांवर काँग्रेसचा प्रभाव होता. मात्र, १९९५ नंतर चित्र बदलले. शिंदखेडा, धुळे, नंदुरबार, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर येथून काँग्रेस हद्दपार झाली. हळूहळू खान्देशात हे लोण पसरत आहे, पण लोकसभा निवडणुकीत जशी लाट पाहायला मिळते तसे चित्र विधानसभेच्या वेळी खान्देशात कधीच नव्हते. यंदाही तीच परिस्थिती असणार आहे.
खान्देश म्हणजे आदिवासी, मराठा समाजाचे प्राबल्य असलेला प्रांत. त्यात दलित, अल्पसंख्याक, साळी, कोळी, माळी, वंजारी, राजपूत, धनगर, लेवा यांचीही त्या त्या मतदारसंघात निर्णायक भूमिका बजावण्याची ताकद आहे. त्यामुळेच इथे मतदारसंघनिहाय गणित बदलते. जेथे जातीचे समीकरण नाही, तेथे वैयक्तिक प्रभाव कामी आला आहे. जसे जळगावात सुरेश जैन, धुळ्यात अनिल गोटे यांचे उदाहरण देता येईल. खान्देशात एकूण २० मतदारसंघ आहेत. त्यापैकी आठ मतदारसंघ हे अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव आहेत. उर्वरित बारा मतदारसंघासाठी चुरशीची निवडणूक होते. यंदा युती, आघाडीत बिघाड होईल म्हणून अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून होते, पण हाती येणारी सत्ता घालवायची नाही म्हणून युतीच्या नेत्यांना शहाणपण सुचलं आणि महायुती कायम राहिली. त्यामुळे आघाडीही बिघडण्याची चिन्हे नाहीत. याचाच अर्थ आघाडीविरुद्ध युती अशाच लढती होतील. नवापूर, धुळे आणि भुसावळ येथे बंडखोर उपद्रव्यमूल्य दाखवण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघ आहेत. यापैकी युतीकडे चार, राष्ट्रवादी पाच आणि दाेन जागा अपक्षांकडे आहेत. या अपक्षांनी नुकताच राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील बडे प्रस्थ एकनाथ खडसे सुरेश जैन हे युतीचे नेते असले तरी दोघांमध्ये सख्य नाही. त्यामुळे ते एकमेकांना मदत करतील, अशी अपेक्षा करणे फोल आहे. खडसेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे म्हणून खान्देशातून अधिक आमदार निवडून आणण्यावर त्यांचा जोर आहे. यामुळेच त्यांनी भुसावळातून राष्ट्रवादीचे संजय सावकारे, नंदुरबारमध्ये विजय गावित यांना भाजपत आणले. धुळ्यातून अनिल गोटे आणि चोपड्यातून जगदीश वळवीही वाटेवर आहेत. खडसे मुख्यमंत्री किंवा मंत्री झाले तर जामनेरातून हॅटट्रीक करणार्‍या गिरीश महाजनांना मंत्रिपद मिळणे कठीण आहे. त्यामुळे अधूनमधून त्यांच्यातही शह-काटशहाचे राजकारण सुरू असते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे घरकुल घोटाळ्यात तुरुंगात आहेत. उमेदवारी मिळते किंवा नाही यावर त्यांचे भवितव्य आहे. समजा उमेदवारी मिळाली तरी तुरुंगातून प्रभाव पाडण्याइतपत त्यांचे प्रस्थ नाही. यापेक्षा थोडी वेगळी परिस्थिती सुरेश जैन यांची आहे. जैनही तुरुंगात आहेत, मात्र तरीही शिवसेनेने उमेदवारी देऊ केली आहे. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्यांचे पद धोक्यात असेल. त्यामुळे त्यांचे सुपुत्र, मुंबईतील उद्योजक राजेश जैन यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. सुरेश जैन यांच्या विरोधात अजून कुणी तगडा उमेदवार नाही. मनसेचे ललित कोल्हे आणि काँग्रेसचे डॉ. अर्जुन भंगाळे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र या दोघांच्या मतविभाजनाचा लाभ जैन यांनाच हाेण्याची शक्यता आहे. परंतु सुरेश जैन यांचा विजय नैतिक असेल का? असा प्रश्न सतावू शकतो. म्हणूनच राजेश जैन यांचे नाव पुढे येत आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यापुढे तुल्यबळ प्रतिस्पर्धी देण्याची आखणी राष्ट्रवादीने केली आहे, पण त्यांना यश मिळेल याची शास्वती नाही. जळगाव ग्रामीणमध्येही शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांची जोरदार तयारी आहे. देवकर आत गेल्यामुळे अन्य उमेदवार कुणीही असो त्यांना जिंकण्याची अपेक्षा आहे. काँग्रेसला रावेरमधून शिरीष चौधरी आणि राष्ट्रवादीला अंमळनेरातून साहेबराव पाटील यांना जागा जिंकून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. या दोघांनी अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे पक्षातील इच्छुकांचा गट नाराज आहे. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसला आज तरी रावेर सोडले तर कुठेही जिंकण्याची संधी नाही. त्यामुळे युतीविरोधात राष्ट्रवादीचेच आव्हान असेल.
धुळे जिल्ह्यात पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी साक्री शिरपूर हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. साक्रीत योगेश भोये आणि शिरपुरात काशिराम पावरा हे काँग्रेसचे आमदार आहेत. साक्रीत भोयेंबद्दल कुठे नाराजी तर कुठे खुशी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फायदा भाजपच्या संभाव्य उमेदवार मंजुळा गावित यांना मिळणे शक्य आहे. गावित या धुळ्याच्या महापौर होत्या. त्यामुळे त्यांची इमेज बर्‍यापैकी झाली आहे. काँग्रेसने इथली जागा गमावली तर त्याचे फारसे आश्चर्य वाटणार नाही. शिरपूर मतदारसंघ हा अमरीश पटेलांचा. तो गत वेळेस राखीव झाल्यामुळे पटेल यांनी काशिराम पावरा निवडून आणले. या मतदारसंघात खर्चासह संपूर्ण ताकद ही पटेलांची असते. या वेळेस भाजप उमेदवार इथे दिला जाईल. त्यामुळे लढत रंगेल, पण विजय पटेलांच्या उमेदवाराचाच होईल, अशी स्थिती आहे. धुळे शहर, ग्रामीण शिंदखेडा या मतदारसंघांत चुरस आहे. धुळे शहर हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. पण अनिल गोटेंना भाजपात आणून त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याच्या हालचाली आहेत. त्यामुळे शिवसेनेत दाखल झालेल्या सतीश महाले, सुभाष देवरेंच्या गोटात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या राजवर्धन कदमबांडे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. धुळे ग्रामीण हा काँग्रेसचा बालेकिल्ला गेल्यावेळी शिवसेनेच्या प्रा. शरद पाटील यांनी रोहिदास पाटलांना हरवून सर केला. त्यावेळेस मिळालेली रोहिदास पाटील विरोधकांची साथ यंदा मिळणे कठीण असल्याने शरद पाटील यांना निवडणूक जड जाईल. पण रोहिदास पाटील यांनी स्वत: ऐवजी सुपुत्र कुणाल पाटील यांची चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या किरण पाटील यांनीही तयारी चालवली आहे. दुसरीकडे स्व. द. वा. पाटील यांचे सुपुत्र मनोहर भदाने हेही भाजपत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे धुळे ग्रामीणचे चित्रही अवघड बनले आहे.
शिंदखेड्यात जयकुमार रावल यांना भाजपचे तिकिट निश्चित आहे. त्यांच्या विरोधात गतवेळेस काँग्रेसतर्फे श्याम सनेर उमेदवार होते. या वेळेस छगन भुजबळ यांचे सचिव संदीप बेडसे हे राष्ट्रवादीकडून तयारीत आहेत. त्यामुळे ज्यांना तिकीट मिळणार नाही, तो गट पाडापाडीत सहभागी होऊन आघाडीला नुकसान पोहोचवू शकतो.

नंदुरबार जिल्ह्यात डॉ.. विजयकुमार गावित यांनी भाजप, त्यांचे आमदार बंधू शरद गावित यांनी राष्ट्रवादी आणि तिसरे बंधू राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. चोपड्यातून शालक जगदीश वळवी हेही भाजपच्या वाटेवर आहेत. गावित यांनी संपूर्ण जिल्ह्याची सत्ता घरातच ठेवण्याचा केलेला प्रयत्न आदिवासींच्या योजनांमधील त्यांच्यावरील घोटाळ्याचा आरोप युतीला सर्वच जागांवर विजय मिळण्यात अडसर ठरू शकतो. डॉ. गावित यांना स्वत:च्या विजयासाठीच ताकद लावावी लागेल. त्यांची लढत यंदाही पारंपरिक विरोधक चंद्रकात रघुवंशी यांच्याशी असेल. लोकसभेला नवापूरमध्ये मोदी लाटेतही काँग्रेसला ११ हजारांची लीड होती. त्यामुळे त्यांना सहानुभूती मिळणे शक्य आहे. शरद गावित यांचा स्वभाव पाहता त्यांना पुन्हा विजयासाठी कष्ट घ्यावे लागतील. काँग्रेसचे बालेकिल्ले तळोदा-शहादा आणि धडगाव-अक्कलकुवामधून अ‍ॅड. पद्माकर वळवी आणि अ‍ॅड. के.सी. पाडवी या दोन मित्रांनाही डॉ. गावितांच्या विरोधाचा सामना करावा लागेल.
जैन, देवकर औत्सुक्याचा विषय
घरकुलघोटाळ्यात अडकलेले शिवसेनेचे सुरेश जैन आणि राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांना यंदाच्या निवडणुकीत तुरुंगातूनच सूत्रे हलवावी लागणार आहेत. त्यामुळे ते स्वत: िकंवा त्यांचे समर्थक किंवा नातेवाईक कुणीही उमेदवार असले तरी या दोघांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे तुरुंगात राहून हे दोन्ही नेते निवडणुकीत किती प्रभाव पाडू शकतात, हा औत्सुक्याचा विषय असणार आहे.