औरंगाबाद - पंतप्रधान
नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्यावर आहेत.
बीड मधील सभेनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादेत त्याची सभा होत आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या पंधरा वर्षांच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, 'साठ वर्षे काँग्रेसचे सरकार होते, मात्र ते आमच्या 60 दिवसांच्या कारभाराचा हिशोब मागत आहेत.'
महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक
मोदी म्हणाले, ही निवडणूक महाराष्ट्राचे भविष्य ठरविणारी आहे. कोण मुख्यमंत्री होणार - कोण नाही, यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, याचा तुम्ही विचार करा. महाराष्ट्राचे भाग्य कोण बदलेल हे तुम्हाला ठरवायचे आहे. यावर जनतेतून 'मोदी - मोदी'च्या घोषणा दिल्या गेल्या त्यानंतर त्यांनी, मी तुमचा सेवक आहे, असे म्हटले.
औरंगाबादमधील विराट सभेकडे निर्देश करत, मी असा नजरा आधी कधीही पाहिला नाही असे उदगार मोदींनी काढले. हवा बदलत असल्याचे या जनसागरावरुन कळून येत असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
पंधरा वर्षात आघाडी शासनाने महाराष्ट्राला अनेक वर्षे मागे नेले, असे सांगत उपस्थित जनतेशी संवाद साधत त्यांनी विचारले महाराष्ट्राच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे? शेतकर्यांना आत्महत्या केल्या असत्या का? जातीय दंगली झाल्या असत्या का? आई-बहिणींवर अत्याचार झाले असते का? आमची पंधरा वर्षे वाया गेली आहेत. आता आमचा एक दिवसही वाया जाऊ द्यायचा नाही याचा निर्णय येत्या 15 तारखेला घ्यायचा आहे.
महाराष्ट्र देशाला पुढे नेणारे राज्य
महाराष्ट्र फक्त राज्याचे भवितव्य ठरविणारे राज्य नाही. या राज्याने देशाला रोजी-रोटी मिळवून दिली आहे. मात्र तोच महाराष्ट्र आज दयनिय अवस्थेत आहे. येथील नागरिक मागे राहाण्यासाठी नाही, तर आघाडीवर राहाण्यासाठी असतो. मात्र येथील सरकारने त्याला मागे खेचले आहे.
दिल्लीत मोदी सरकारने आर्थिक विकासावर आघाडी घ्यायची असेल तर, महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव मिळवून द्यावे लागणार आहे. त्याशिवाय देश पुढे जाणार नाही. मात्र, असेच सरकार राहिले तर, मी दिल्लीहून कितीही पाठवले तर, त्याचा दुरपयोग झाल्याशिवाय राहाणार नाही, असे ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांना टोला
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले, येथील नेते राजकीय अस्पृष्यता पाळतात.
मोदींच्या सरकारी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सहभाग घेतला नव्हता, त्याचा उल्लेख न करता, येथील सरकार राजकीय अस्पृष्यता पाळते असा टोला त्यांनी हाणला.
60 दिवासांमध्ये करुन दाखवले
कैलास मानसरोवरला जाण्यासाठी खडतर मार्ग होता. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले तेव्हा आम्ही त्यांना विनंती करुन चीनकडून जाणारा मार्ग खुला करुन घेतला. काँग्रेसच्या 60 वर्षांमध्ये हे झाले नाही, आम्ही 60 दिवसांमध्ये करुन दाखविले, असे ते म्हणाले.
प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कुटुंबांची बँक खाती उघडण्यात आली. काँग्रेसच्या काळात ज्या गरीबांसाठी बँकाचे राष्ट्रीयकरण झाले, ते गरीब साठ वर्षांमध्ये कधी बँकेत दिसले का, असा सवाल त्यांनी केला. शुन्य रकमेवर खाते उघडण्यात येणार असतानाही देशातील गरीब जनतेने बँकांमध्ये तीन हजार कोटी रुपये जमा केले. हे मोदी सरकारने करुन दाखवले, असे ते म्हणाले. बेरोजगारांसाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. तरुणांना कौशल्यविकासासाठी केंद्र सरकार मदत करत असल्याचा त्यांनी दावा केला.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, का बोलले नाही मोदी युतीवर...शेवटच्या स्लाईडवर बघा मोदी यांचे भाषण जसेच्या तसे....आणि मोदींसाठी लोकांनी कशी केली होती गर्दी...अगदी झाडावर चढून ऐकले मोदींचे भाषण...