आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: दादांचा दावा, काकांचा कावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युतीचे घटस्फोट आणि आघाडीचे तीन तेरा वाजल्यापासून या पदासाठी उमेदवारांची संख्या कित्येकपटीने वाढली आहे. चौरंगी-पंचरंगी लढतीत कोणाचे घोडे बसणार आणि कोणाचे घोडे बाजी मारणार हे खुद्द ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही अशी परिस्थिती आहे. असे असले तरी प्रसारमाध्यमातील काही स्वयंघोषीत ब्रम्हदेवांनी आपआपले अंदाज जनमताच्या नावाखाली प्रसारीत, प्रकाशित करण्यास सुरूवात केली आहे. त्यातून आलेल्या आकडेवारीनुसार अनेकांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. इटलीच्या मॅडमचा विदेशी मुद्दा जोरदारपणे मांडत आपल्या स्वाभिमानाचा आगळा आदर्श ठेवत पुलोदस्वामी महाराजांनी काही वर्षांपूर्वी हातकरांचा हात सोडला व घड्याळ हातावर बांधले. तेव्हापासून त्यांचे पुतणे धरणमित्र दादांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावते आहे. निकालानंतरच्या समीकरणात आपल्याला नक्कीच ही खुर्ची मिळणार अशी आशा धरणमित्र दादांना आहे. त्यांनी आपले मित्र सिंचनकार सुनीलरावांना या कामासाठी कामाला लावले होते. सिंचनकार सुनीलराव तटावरून सर्वांवर नजर ठेवत होते. त्यांनी ग्रामभूषण जयंतराव मामांना फोन केला व चाचपणीस सुरूवात केली.
‘काय मामा, काय म्हणतोय प्रचार’
‘बरा चाललाय, आज कस काय आठवण काढलीत ’
‘काय नाय म्हणल सीएमबद्दल काय मत हाय तुमचं’
आपलच नाव आपण सुचवावे असे जयंतमामाना वाटले पण त्यांनी ते टाळले, ‘काही नाही, आपले आबा आहेत की त्यासाठी ’
‘आर..आरं... नावसुध्दा घेऊन नको त्यांचं लय घाण करून ठेवली त्यांनी ’
मग सिंचनकारांनी अकलूजकर दादांना फोन लावला, ‘काय दादा काय म्हणता,’ दादांनी नाराजीनेच बोलायला सुरूवात केली ‘बोला सुनीलराव आज कशी आठवण आली आमची.’
‘म्हणल सीएमबाबत तुमचं मत जाणून घ्यावं’
दादांनी पटकन गुगली टाकत सांबा सरदार छगनरावांचे नाव सुचवले व हसत फोन कट केला.
सिंचनकार सुनीलराव काळजीत पडले. कोणीच दादांचे नाव घेइना. त्यांनी मग सांबा सरदार छगनरावांना फोन लावला.
छगनरावांनी मफलरला झटका देत फोन उचलला, ‘बोला सुनीलराव, मला वाटलच होत तुमचा फोन येणार म्हणून, सीएमबाबत विचारणा करणारा’
सांबा सरदाराच्या उत्तराने सिंचनकार एकदम दचकलेच, उसन आवसान आणून ते म्हणाले, ‘तसं नाही तुम्ही पक्षात ज्येष्ठ तुमच मत जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्या मताचा आदर करावा लागणार आहे.’
मफलरशी चाळा करत सांबा सरदारानी एक एक शब्दावर जोर देत सांगतिले, ‘आता पुलोदस्वामींशिवाय सीएम पद सांभाळायला कोणीच समर्थ नाही. मी तसे सर्व सरदारांना बोललो आहे.’
सिंचनकारांना काय बोलावे ते सुचेना, सांबा सरदारांनी हसत हसत फोन कट केला. सिंचनकारांनी ताबडतोब धरणमित्र दादांना फोन लावला.
‘दादा काही खरं नाही याठिकाणी’
‘काय झाले त्याठिकाणी ’
‘सर्वानी काकांचे नाव फायनल केलयं’ हे ऐकताच दादांना काय बोलावे, काय करावे ते सुचेना. काकांनी मस्त डाव टाकल्याचे दादांच्या लक्षात आले. दादांची पुन्हा सटकली...
रिंग मास्टर