आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: कमळाची स्वारी, बाणाची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडाचे वातावरण चिंतातुर होते. जागावाटपाचा तह तुटल्यापासून गडावरचे सारे सरदार धास्तावले होते. त्यातच दिल्लीहून बिनीचे सरदार दाखल झाले होते. दुसरीकडे गुजराती गनिमाची कट कारस्थाने सुरूच होती. स्वराज्यावर आलेले हे संकट कसे परतावून लावायचे व गडावर भगवा कसा फडकवायचा याचाच विचार सारे मावळे करू लागले. कमळाचार्य खाशा विचारांची शिबंदी घेऊन स्वराजातील ठाणी काबीज करत निघाले होते. युतीचा तह मोडल्यापासून सेनेच्या धाकल्या महाराजांना उसंत नव्हती. त्यातच दिल्लीशाहीच्या सत्तेच्या गुळाची ढेप कमळाराणीकडे असल्याने अनेक मुंगळे सरदार तिच्याकडे जात होते. काव्याचार्यही तिकडच्या गोटात गेल्याची सल धाकल्या महाराजांना खुपत होती. राज्यभर पसरलेले बहिर्जीचे दूत गडावर ‘२४ बाय ७’ कार्यरत राहून सारे अपडेट पुरवत होते. कमळाचार्यांनी पंढरपूर जिंकले आता ते तुळजापुराकडे कूच करताहेत अशी खबर गडावर पोहोचून एक प्रहर उलटला होता. गडावर एक गूढ शांतता पसरली होती. एक दूत धापा टाकीत गडावर दाखल झाला. लेखणीबहाद्दर सरदारांना भेटण्यासाठी तो त्यांच्या दालनात गेला, लेखणीबहाद्दर सरदार अग्रलेखातून मारायच्या बाणांना धार लावीत बसले होते. दूताला पाहताच त्यांनी एकवार आपल्या आडव्या केसावरून हात फिरवला, डोळ्यावरचा चष्मा काढून शर्टाने पुसला व परत डोळ्यावर चढवत दबक्या आवाजात दूताला प्रश्न केला, ‘बोला काय खबर?’ दूताने मान खाली घालून उत्तर दिले, ‘सरदार, खबर बुरी आहे. तुळजापूरही कमळाचार्यांनी मारले.’ ते ऐकताच लेखणीबहाद्दरांच्या कपाळावर आठ्यांचा वेढा पडला. त्यांनी दूताला बाहेर जाण्याची खूण केली. दूत जाताच लेखणीबहाद्दर तडक धाकल्या महाराजांकडे निघाले. त्यांनी धाकल्या महाराजांच्या कानावर सर्व अपडेट घातले. धाकल्या महाराजांनी सर्व सरदारांना सदरेवर जमा होण्याचा हुकूम दिला.
सेनेचे धाकले महाराज सदरेवर आले. तोवर लेखणीबहाद्दर, कोकणतारा कदम, दादरकर मनोहरपंत, तहबहाद्दर अनिलमामा, थिंकटँकर सुभाषदादा, तोफेकर रावते अशी खाशी मंडळी व युवराज आदित्यमहाराज हाती टॅब घेऊन सदरेवर बसली होती. लेखणीबहाद्दर सरदारांनी कमळाचार्यांनी पंढरपूर, तुळजापूर मारल्याची माहिती पुन्हा दिली. धाकल्या महाराजांनी एकवार सदरेवर नजर टाकली व बोलायला सुरुवात केली, मंडळी स्वराज्यावर बाका प्रसंग आला आहे. यातून मार्ग काढायलाच हवा. तेवढ्यात एक दूत धावत-पळत तेथे आला. धाकल्या महाराजांना मुजरा करून त्याने बातमी सांगितली, जनमत चाचण्यात कमळ शतकाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. बाणाच्या पदरात अर्ध शतक ते पाऊण शतकाचे माप पडेल असे आकडेवारी सांगते. दूताचा निरोप ऐकताच सदरेवर काही काळ शांतता पसरली. मग युवराजांनी बोलण्यास सुरुवात केली, ‘सध्याची स्थिती पाहता जरा सबुरीनं घेणं अगत्याचे राहील. त्यांना आपल्या मदतीशिवाय सत्तेचा सोपान गाठता येणार नाही. कमळाला बाहेरून पाठिंबा देऊ. आपले गड-किल्ले शाबूत करू आणि योग्य वेळी पाठिंब्याचा दोर कापून टाकू.’ युवराजांची योजना ऐकून सदरेच्या जीवात जीव आला.
- रिंग मास्टर