नवी दिल्ली -
अमित शहा यांनी भाषणात केलेला भाजपचा जयघोष आणि शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा अनुल्लेख यामुळे शिवसेनेत संताप उसळला असतानाच मोदीलाटेच्या बाहेर पडत नसलेल्या भाजपपुढेही पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. शहा यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे, यावर राज्यातील भाजप नेतेही संभ्रमात आहेत. तथािप, युती शाबूत राहावी, अशीच या नेत्यांची भावना आहे. दरम्यान, शहांसोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची शुक्रवारी बैठक होणार असून, युतीसाठी त्यांचे मन वळवण्यात येणार असल्याचेही समजते.
आमच्या नेत्यांना शहाणपण यायला हवे
- भाजपचे दुसरे एक जबाबदार नेते म्हणाले की, शिवसेनेचे सोडाच, पण आमच्या नेत्यांनाही आम्ही ओळखू शकलो नाही. मोदी आणि शहांच्या मनात काय चालले आहे हे मीच ओळखू शकत नाही. शहा आज असे का वागले हे आम्हालाच कळाले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत राहूनच राजकारण करायचे आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाने तरी आमच्या वरिष्ठांना शहाणपण यायला हवे होते. मोदींची हवा ठीक आहे, पण तो जोश आता कोठे राहिला आहे.
दोघांनाही पर्याय नाही, युती होईलच
- भाजपचे हेच दुसरे नेते पुढे म्हणाले की, शेवटच्या क्षणी का होईना, पण युती नक्की होईल याची मला खात्री आहे. आम्ही त्याच कामाला लागलो आहोत. नितीनजीसुद्धा उद्या यात लक्ष घालतील. शहांनादेखील आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत आहोत. उमेदवारांची यादी जाहीर करण्याचे शिवसेना असे म्हणत असली तरी आम्हा दोघांनाही सत्ता आणण्यासाठी एकमेकांशिवाय पर्याय नाही; असेही या नेत्याने म्हटले आहे.
हेकेखोराशी मैत्र निभावले
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी वाटाघाटी होतात. शिवसेना हेकेखोर आहे हे आम्हाला ठाऊक आहे. तरीही खांद्यावर हात ठेवून आम्ही मैत्री निभावून नेतो. आम्ही बाळासाहेबांना थेट भेटत होतो. त्यांच्या दोन शिव्या ऐकायच्या आणि शेवटी तेच म्हणायचे ‘जाऊ द्या, हेही
आपलेच पोरं आहेत’ आणि वाटाघाटीला पूर्णविराम मिळायचा. वाजपेयी, अडवाणी यांचीही भूमिका महत्त्वाची असायची. ते कोणत्याही गोष्टी ताणत नसत, असे युतीतील प्रत्येक घडामोडीचा साक्षीदार असलेल्या एका नेत्याने सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही मतभेद
जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीतही रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीत तर अंतर्गत मतभेद आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. आघाडी झालीच तर १४४ जागा मिळायला हव्यात, अशी ठाम त्यांची भूमिका आहे.
मुख्यमंत्रिपद सोडणार नाही : अजित पवार
२००४मध्ये जास्त जागा मिळूनही आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी दावा केला नाही. मात्र यावेळी तशी चूक होणार नाही, असे अजित पवारांनी काँग्रेसला ठणकावले.