आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 Campaign Stop Today Evening

प्रचाराच्या तोफा थंडावल्या, सर्वच नेते आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून; आता नजरा मतदानाकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा सायंकाळी सहा वाजता शांत झाल्या. आता काही तासांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरवात होईल. त्याआधी प्रमुख पाच पक्षांसह सर्वच उमेदवारांनी आज (सोमवार) प्रचाराचा धडका उडवून दिला होता. पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा जाहीर सभांवर भर होता, तर काही नेत्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. प्रत्यक्ष रिंगणात असलेल्या उमेदवारांनी कॉर्नर बैठका, रोड शो आणि मतदारांच्या गाठीभेटीला महत्त्व दिल्याचे दिवसभर दिसून आले.
युती आणि आघाडी तुटल्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची शोधाशोध केल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रचाराला थोडा उशिर झाला होता. 'रात्र थोडी आणि सोंगे फार' अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेपली होती. 288 मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्याला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि जेथून सकारात्मक निकाल मिळेल अशा तालुक्यांच्या ठिकाणी, धार्मिक स्थळी नेत्यांनी प्रचारसभा घेण्याला प्राधान्य दिले होते.
युती तुटल्यामुळे भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्यभर फिरत होते. आज त्यांनी कोकण दौरा केला. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी पंतप्रधानांनी सभा घेण्याचे यंदा राज्यातील जनतेने प्रथमच पाहिले. त्यावरुन विरोधकांनी मोदींवर टीका देखील केली. आजही पंतप्रधान मोदींच्या राज्यात तीन सभा होत्या.
दुसरीकडे, शिवसेनेचे पक्षप्रमुख पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरताना यावेळी दिसले. आज त्यांच्या तीन विविध ठिकाणी प्रचार सभा झाल्या. त्यातील एक भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्यातही झाली. युती तोडण्यामध्ये देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार आणि खडसेंची महत्त्वाची भूमिका असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शेवटची प्रचारसभा मुक्ताईनगरमध्ये घेतल्याचे सांगितले जाते.
तर, काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज त्यांच्या होमग्राउंडवर तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेतेही आपापल्या मतदारसंघातील प्रचारात व्यस्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि शेवटची प्रचारसभा बारामती मध्ये दुपारी चारवाजता घेतली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा या बहुतेक रात्री असतात, मात्र आज प्रचार सायंकाळी सहा वाजताच संपल्यामुळे त्यांनी रविवारी सांयकाळापासून रात्री 10 पर्यंत मुंबईतील अनेक ठिकाणी मनसे उमेदवारांचा प्रचार केला. त्यांची शेवटची प्रचारसभा मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांच्यासाठी लालबाग येथे झाली. त्यांनी देखील सोमवारी पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात सहभागी होऊन प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाची भूमिका आणि मनसे काय करु शकते हे सांगितले.

पुढील स्लाइडमध्ये, प्रचारात कोणते मुद्दे राहिले चर्चेत