आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इच्छुकांची चंगळ; मतदारांचा होणार गोंधळ; युती आणि आघाडी तुटल्याने प्रत्येक ठिकाणी होणार पंचरंगी लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युती तुटल्याची घोषणा गुरुवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केल्याने आता शिवसेना व भाजपचे स्वतंत्र उमेदवार पहिल्यांदाच मतदारांसमोर जाणार आहेत. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही फुटली असून त्यांचेही उमेदवार स्वतंत्रपणे मतदारांसमोर जाणार आहेत. मनसेची पाचवी किनार लाभणार असल्याने जिल्ह्यात पंचरंगी लढतीचा फड रंगणार आहे. त्यामुळे मतदारांनाही भरपूर पर्याय उपलब्ध होणार आहेत.
चर्चा, बैठकांचे दिवस-रात्र चालणारे महायुतीचे गुऱ्हाळ गुरुवारी सायंकाळी एकदाचे संपले. युती तुटल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे यांनी केली. दोन्ही पक्षांतील उमेदवारांना स्वतंत्रपणे मतदारांसमोर जाण्याची पहिल्यांदाच संधी मिळत आहे. जिल्ह्यात एकूण बारा मतदारसंघ आहेत. त्यातील नगर, पारनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, शिर्डी, संगमनेर, अकोले हे सात मतदारसंघ शिवसेनेकडे, तर नेवासे, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदे, कर्जत-जामखेड हे पाच मतदारसंघ भाजपकडे होते. सध्या शिवसेनेचे अनिल राठोड, विजय औटी व अशोक काळे हे आमदार आहेत. भाजपकडे राम शिंदे व शिवाजी कर्डिले हे दोन आमदार आहेत.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिनसले असून त्यांचेही स्वतंत्र उमेदवार रिंगणात राहणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक चार आमदार राष्ट्रवादीचे होते. अकोल्यातून मधुकर पिचड, शेवगाव-पाथर्डीतून चंद्रशेखर घुले, नेवाशातून शंकरराव गडाख व श्रीगोंदेतून बबनराव पाचपुते यांचा त्यात समावेश होता. पाचपुते आता भाजपमध्ये गेले आहेत. काँग्रेसकडे संगमनेरचे बाळासाहेब थोरात, शिर्डीतून राधाकृष्ण विखे, श्रीरामपुरातून भाऊसाहेब कांबळे हे तीन आमदार आहेत. इतर पक्षांकडे एकही आमदार नाही. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर यावेळी मतदारांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. पक्षीय पातळीवरील किमान पाच उमेदवार असतील. याशिवाय इतर पक्ष व अपक्षांचा पर्यायही खुला आहे.

आयात उमेदवारांना संधी
गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेना व भाजप एकत्रितपणे युतीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे गेले आहेत. जिल्ह्यात त्यांच्या जागावाटपात सुरुवातीपासूनच कोणताही फेरबदल झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांत भाजप कमकुवत, तर भाजपकडे असलेल्या मतदारसंघांत शिवसेना कमकुवत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना दोन्ही पक्षांना उमेदवार निवडण्यासाठी वेळ व पर्यायही कमी आहेत. त्यामुळे आयात उमेदवारांना संधी मिळेल.
असे असतील उमेदवार
नगर : अनिल राठोड (शिवसेना), सत्यजित तांबे (काँग्रेस), संग्राम जगताप (राष्ट्रवादी), वसंत लोढा (मनसे), भाजपचे संभाव्य उमेदवार - माजी उपमहापौर गीतांजली काळे, नगरसेवक सुवेंद्र गांधी, भय्या गंधे, अ‍ॅड. अभय आगरकर, नगरसेवक बाबासाहेब वाकळे.
पारनेर : विजय औटी (शिवसेना), राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार - कािशनाथ दाते, सुजित झावरे, गुलाबराव शेळके, काँग्रेसचे संभाव्य उमेदवार - नंदकुमार झावरे, राहुल झावरे, राहुल शिंदे, भाजपचे संभाव्य उमेदवार - बाबासाहेब तांबे, विश्वनाथ कोरडे, माधवराव लामखडे, मोहन रांधवन (मनसे)

शेवगाव : चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी), देविदास खेडकर (मनसे), भाजपचे संभाव्य उमेदवार - मोनिका राजळे, अशोक गर्जे, शिवाजी काकडे, दिलीप लांडे, तुषार वैद्य, दगडू बडे, पी. डी. फकीर,
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार - रामदास गोल्हार, विष्णूपंत पवार, रफीक शेख, मोहन पालवे,
काँग्रेसचे संभाव्य उमेदवार - उद्धवराव वाघ, पांडुरंग खेडकर, मिठूभाई शेख.
कोपरगाव : आशुतोष काळे (शिवसेना), काँग्रेसचे संभाव्य उमेदवार - राजेंद्र जाधव, काका कोयटे, भाजपचे संभाव्य उमेदवार - विजय वहाडणे, सुभाष दवंगे, अ‍ॅड. मच्छिंद्र खिलारी, मनसेचे संभाव्य
उमेदवार - सतीश काकडे, संतोष गंगवाल.
अकोले : वैभव पिचड (राष्ट्रवादी), काँग्रेसचे संभाव्य उमेदवार - सुनीता भांगरे, मधुकर तळपाडे (शिवसेना), मनसेचे संभाव्य उमेदवार - डॉ. किरण लहामगे, भाजपचे संभाव्य उमेदवार - अशोक भांगरे, जनार्दन मुंडे.
शिर्डी : राधाकृष्ण विखे (काँग्रेस), शिवसेनेचे संभाव्य - अभय शेळके, राष्ट्रवादीचे संभाव्य डॉ. राजेंद्र पिपाडा, सुरेंद्र खर्डे, भाजपचे संभाव्य - राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, मनसेचे संभाव्य - शेखर बोराडे.
संगमनेर : बाळासाहेब थोरात (काँग्रेस), शिवसेनेचे संभाव्य - साहेबराव नवले, बाबासाहेब कुटे, अप्पा केसेकर, राजेंद्र रहाणे, भाजपचे संभाव्य - राधावल्लभ कासट, भरत फटांगरे, राजेश चौधरी, राष्ट्रवादीचे संभाव्य - दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, मनसेचे संभाव्य - डॉ. अरुण इथापे.
राहुरी : शिवाजी कर्डिले (भाजप), काँग्रेस संभाव्य - अ‍ॅड. सुभाष पाटील, उदयसिंह पाटील, राष्ट्रवादी संभाव्य - शिवाजी गाडे, उषा तनपुरे, प्राजक्त तनपुरे, ज्ञानेश्वर गाडे (मनसे).
श्रीगोंदे : शशिकांत गाडे (शिवसेना), भाजप संभाव्य - बबनराव पाचपुते , काँग्रेस संभाव्य - बाळासाहेब हराळ, बाळासाहेब गिरमकर, राष्ट्रवादी संभाव्य - राहुल जगताप, घनश्याम शेलार, स्वतंत्र भारत पक्ष संभाव्य - अनिल घनवट.
कर्जत - जामखेड : शिवसेना संभाव्य - रमेश खाडे, मधुकर राळेभात, आमदार राम शिंदे (भाजप), काँग्रेस संभाव्य - बापूसाहेब देशमुख, राजेंद्र निंबाळकर, अंबादास पिसाळ, सय्यद मन्सूर, राष्ट्रवादी संभाव्य - राजेंद्र फाळके, राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, राजेंद्र गुंड, शहाजी राळेभात.
नेवासे : शंकरराव गडाख (राष्ट्रवादी) काँग्रेस संभाव्य - दिलीप वाकचौरे, शिवसेना संभाव्य - बाळासाहेब पवार, भाजप संभाव्य - बाळासाहेब मुरकुटे, भानुदास मुरकुटे, अजित फाटके, दिलीप मोटे (मनसे).
श्रीरामपूर : भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), राष्ट्रवादी संभाव्य - डॉ. सुधीर क्षीरसागर, शिवसेना संभाव्य - लहू कानडे, भाजप संभाव्य - सुनीता गायकवाड, मनसे - अ‍ॅड. स्वप्नील जाधव.
श्रीगोंद्यात इच्छुक असलेले काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. राहुल जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची अटकळ बांधली जात असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसकडून बाळासाहेब हराळ यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते, राहूल जगताप, बाळासाहेब हराळ असा सामना रंगणार आहे.
श्रीगोंद्यात हराळांची उडी
श्रीगोंद्यात इच्छुक असलेले काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार यांना उपाध्यक्षपद देण्यात आले. राहुल जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार असल्याची अटकळ बांधली जात असल्याने या मतदारसंघातून काँग्रेसकडून बाळासाहेब हराळ यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे बबनराव पाचपुते, राहूल जगताप, बाळासाहेब हराळ असा सामना रंगणार आहे.

भाजपचा उत्साह वाढला
शहरातील युतीची जागा भाजपला द्यावी, अशी मागणी भाजपच्या पदाधिका-यांनी केली होती. युती तुटल्यामुळे भाजप पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. महापालिका निवडणुकीपासून शिवसेना-भाजप नेत्यांमधील वाद वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. आता आमदार अनिल राठोड यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याने लढत चांगलीच रंगतदार होईल.