नगर- युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने शहर जिल्हा काँग्रेसमध्ये बंडाळी उफाळून आली आहे. शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांनी पदाबरोबर पक्षसदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर तातडीने नगरसेवक दीप चव्हाण यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन शहर जिल्हाध्यक्ष सारडा यांच्यासह सहाजणांनी पक्षाकडे रितसर अर्ज करून नगर मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. बाहेरचा उमेदवार लादल्यास वेगळा विचार करू, असा इशारा देणारा ठरावही संमत करून प्रदेश समितीकडे केला होता. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे व अर्ज डावलून पक्षाने तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोटातील म्हणून तांबे यांच्या उमेदवारीला थेट दिल्लीतून अंतिम स्वरुप मिळाले. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच सारडा यांनी तातडीने पक्षसदस्यत्व व पदाचा राजीनामा प्रदेश समितीकडे पाठवून देत पूर्वी दिलेला इशारा प्रत्यक्षात आणला. सारडा हे पक्षाचे जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना विश्वासात घेऊन तांबे यांची उमेदवारी निश्चित करणे पक्षाला शक्य होते. मात्र, डावलले गेल्याने शहर जिल्हा काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस उबेद शेख यांनीही पक्षापासून दूर जात स्वतंत्रपणे अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तांबे यांच्यासमोर या बंडाळीला तोंड देण्याचे मोठे आव्हान आहे.
पक्षांतर्गत बंडाळीबरोबरच राष्ट्रवादीच्याही आव्हानाचा सामना तांबे यांना करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मिळालेल्या आदेशानुसार गेल्या आठवडाभरापासून महापौर संग्राम जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून प्रचाराला लागले आहेत. त्यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल केला.
काँग्रेसचे शहरात अकरा नगरसेवक आहेत. केडगाव येथील नगरसेवकांची भूमिका माजी महापौर संदीप कोतकर यांच्या निर्णयानुसार ठरणार आहे. कोतकर कुटुंबीय पूर्वी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी जवळीक असणारे म्हणून ओळखले जात. मात्र, त्यांची म्हणावी तितकी मदत न मिळाल्याने कोतकर कुटुंबीय थोरात यांच्यापासून दुरावल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोतकर कुटुंबीयांना साथ देण्याची भूमिका घेतली. काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असलेल्या केडगाव व माजी महापौर कोतकर यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. दरम्यान, तांबे यांनी शहरातील विविध घटकांशी संपर्क साधून
आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
पक्षश्रेष्ठींचा आदेश
पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार गेल्या आठवड्यापासून प्रचार सुरू केला आहे. या आदेशानुसारच उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार प्रचार सुरू राहणार असून पुढील भूमिका घेऊ. प्रचाराला नगरकरांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे.
संग्राम जगताप, महापौर व राष्ट्रवादीचे उमेदवार.
समन्वयाचा अभाव
पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वासाचा, तसेच संघटनात्मक कामांचा अभाव आहे. पक्ष म्हणून कोणी पहायलाच तयार नाही. स्वत:पुरते पाहण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पक्षाऐवजी टोळ्या तयार होत आहेत.उमेदवाराबरोबर असणारे लोक तरी पक्षाचे हवेत. श्रीकांत बेडेकर, ज्येष्ठ काँग्रेस नेते.