आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections Latest News In Divya Marathi

शिवसेनेच्या जिल्ह्यातील दोन्ही प्रमुखांचा बंडांचा झेंडा, गाडेंची श्रीगोंद्यातून, तर खेवरेंची राहुरीतून तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महायुतीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ चांगलेच लांबले असून अर्ज दाखल करण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही तोडगा निघालेला नाही. महायुतीचा निर्णय प्रलंबित असतानाच शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख बंडाचे निशाण फडकावून भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत.
शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे व त्यांच्याच पक्षाचे या भागातील दोन आमदार अनिल राठोड व विजय औटी यांच्यातील संबंध परस्परविरोधी आहेत. जिल्हाप्रमुख व दोन्ही आमदारांमध्ये सख्य नसल्याचे चित्र सातत्याने समोर आले आहे. गाडे हे नगर किंवा श्रीगोंद्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, विद्यमान आमदारांना संधी देण्याचे धोरण पक्षाने घेतल्याने नगरमधून त्यांच्या उमेदवारीचा प्रश्नच उरला नाही. त्यामुळे त्यांनी श्रीगोंद्यातून उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित असल्याने गाडे यांनी आता बंडाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पाचपुते यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली असून आहे. पक्षाचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीही राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असून शिवाजी कर्डिले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. खेवरे यांनी आमदार कर्डिले यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
जिल्ह्याचा प्रमुख म्हणून पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी असलेले जिल्हाप्रमुख बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात युतीच्या संबंधांवर विपरीत परिणाम होणार आहे. परिणामी परस्परांना शह-काटशहाचे राजकारण होऊन युतीला फटका बसण्याची शक्यता आहे.
युती तुटल्याने संधी मिळण्याची शक्यता
महायुतीच्या चर्चेची मालिका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. सातत्याने बैठका, नंतर पुन्हा नाराजी असे सुरू होते. गुरुवारी रात्री युती तुटल्याची घोषणा भाजपकडून करण्यात आली असून आता गाडे व खेवरे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.