आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections Latest News In Divya Marathi

राष्ट्रवादीचा वैजापूर अन् कन्नडच्‍या जागेसाठी नवा डाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- काँग्रेसने वैजापुरात डॉ. दिनेश परदेशी यांची उमेदवारी जाहीर केली, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे. याशिवाय कन्नडची जागा हवी असाही हट्ट धरला आहे. या दोन जागांच्या मोबदल्यात गंगापूर काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या खेचाखेचीसाठी २००९ च्या निकालाचा आधार घेण्यात आला.
दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर अत्यल्प मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. मराठवाडा व नाशिकमधील अपक्ष आमदार नुकतेच राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपात अडथळे येत आहेत. मराठवाड्यातील नायगाव (नांदेड) व अहमदपूर (लातूर) येथील आमदार अनुक्रमे वसंत चव्हाण व बाबासाहेब पाटील नुकतेच राष्ट्रवादीत दाखल झाले. दोन्ही जागा २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या होत्या, तर चांदवडचे (जि. नाशिक) आमदार शिरीष कोतवाल हे अपक्ष असून त्यांनी नुकताच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या जागा २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या उत्तमराव भालेराव यांनी लढवली होती. मराठवाड्यातील दोन्ही जागांवर नवीन समीकरणानुसार राष्ट्रवादी दावा करीत आहे, तर चांदवडच्या जागेवर काँग्रेस दावा करीत असल्याने दोघांची यादी रखडली आहे. याचेच पडसाद औरंगाबाद जिल्ह्यातील जागांच्या अदलाबदलीवर पडू शकतात.
काय आहे राष्ट्रवादीचा फॉर्म्युला?: काँग्रेस-राष्ट्रवादीला १२७-१३० जागा आघाडीत मिळू शकतात. यासाठी राष्ट्रवादीने नवीन समीकरणांचा आधार घेतला आहे. १) जेथे राष्ट्रवादीचे बंडखोर मागील निवडणुकीत पाच हजार अथवा त्यापेक्षा कमी मतांनी पराभूत झाले अशा जागा राष्ट्रवादीला द्याव्यात. २) जेथे काँग्रेस पाच हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाली त्या जागांवरही राष्ट्रवादीला स्वबळ आजमावू द्यावे, असे नवीन सूत्र राष्ट्रवादीने तयार केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्थिती जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूरमध्ये २००४ पासून राष्ट्रवादी बंडखोर निसटत्या फरकाने पराभूत झाल्याने आघाडीत मिळत असलेल्या वाढीव जागांमुळे दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादी दावा सांगू शकते. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी राष्ट्रवादीच्या वाट्याला औरंगाबाद मध्य, पैठण व गंगापूर विधानसभा मतदारसंघ आले आहेत. औरंगाबाद मध्यमधून मुस्लिम उमेदवार देण्यासंबंधी राष्ट्रवादीत निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. पैठण येथून विद्यमान आमदार संजय वाघचौरेंना लढण्याचे संकेत दिले आहेत. गंगापूरमध्ये अनेकांनी उमेदवारी मागितली असली तरी राष्ट्रवादीकडे कृष्णा पा. डोणगावकर व विलास चव्हाण यांच्यापलीकडे राष्ट्रवादी विचार करीत नाही.
राष्ट्रवादीचा नवीन डाव : विधानसभा २००४ मध्ये गंगापूरमध्ये शिवसेना उमेदवार अण्णासाहेब माने (५०९८५) तर राष्ट्रवादीचे विलास चव्हाण यांनी(४६३४२) मते घेतली होती. या वेळी माजी मंत्री अशोक पा. डोणगावकर यांनी बंडखोरी करून ३८ हजार मते घेतली होती. त्या वेळी डोणगावकरांना राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उभे राहिले होते. २००९ मध्ये येथून अपक्ष आमदार प्रशांत बंब विजयी झाले. तेव्हा राष्ट्रवादीने कुंडलिक माने यांना उमेदवारी दिली होती. या वेळीही राष्ट्रवादीतून कृष्णा पा. डोणगावकर, माजी आमदार कैलास पाटील यांनी बंडखोरी केली होती. गंगापूर कायम आपल्याकडे ठेवून वैजापूर व कन्नड मागितले जाऊ शकतात. यावर विरोध झाल्यास केवळ वैजापूरला प्राधान्य दिले जाऊ शकते. तिसरा व शेवटचा पर्याय सरतेशवेटी गंगापूरमध्ये राष्ट्रवादीत कायम पाय ओढाओढी असल्याने राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठीने गंगापूर विधानसभा काँग्रेसला सोडून याबदल्यात वैजापूर व कन्नडसाठी आग्रह धरला जाऊ शकतो.

मताधिक्य वाढल्याने धरला आग्रह
वैजापूरमधून राष्ट्रवादी बंडखोर भाऊसाहेब चिकटगावकर यांनी २००४ मध्ये ३२,४१३ मते घेतली होती. या वेळी शिवसेना उमेदवार आमदार आर. एम. वाणी यांना ४१,३६५ मते मिळाली व ते विजयी झाले. २००९ मध्ये वाणी (५१,०९४), चिकटगावकर (५०,०९८) काँग्रेसचे डॉ. दिनेश परदेशी (३९,४२९) व अपक्ष माजी आमदार कैलास पाटील (१४,७०१) मते मिळाली होती. चिकटगावकर यांचे मताधिक्य वाढत असून २००९ मध्ये त्यांचा निसटता पराभव झाला. कन्नडमध्ये राष्ट्रवादी बंडखोर उदयसिंग राजपूत यांनी २००४ मध्ये (३२,१४५) मते घेतली. या वेळी शिवसेनेचे नामदेव पवार (३५,९५१) व काँग्रेसचे नितीन पाटील (३५,२५१) यांनी मते घेतली. २००९ मध्ये मनसेचे हर्षवर्धन जाधव (४६,१०६), राष्ट्रवादी बंडखोर उदयसिंग राजपूत (४१,९९९), काँग्रेसचे भरतसिंग राजपूत (२४,५६१) तर शिवसेना उमेदवार नामदेव पवार यांना (२२,६१९) मते मिळाली होती. येथेही राष्ट्रवादी बंडखोर राजपूत यांचे मताधिक्य दोन विधानसभा निवडणुकांत वाढलेले असल्याने राष्ट्रवादीचा यामुळे आग्रह अधिक राहील.

फुलंब्री तडजोडीत अशक्य
फुलंब्री मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वक्तव्य केले असले, तरी मागील दोन विधानसभांपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे. २००४ व २००९ मध्ये काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे विजयी झाले. २००९ मध्ये काळे यांना (६३२३६) व भाजपचे हरिभाऊ बागडेंना (६०६४९) मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करू शकते, परंतु तहात सपशेल जिंकू शकत नाही हे सत्य आहे.
प्रचाराचे आदेश
मराठवाड्यातील नायगाव (नांदेड), अहमदपूर (लातूर), जिंतूर -सेलू (परभणी), वैजापूर व कन्नड (औरंगाबाद) आदी जागांवर वाढीव जागांच्या मोबदल्यात राष्ट्रवादी मागणी करू शकते. एकीकडे उमेदवारी जाहीर होत नसली तरी सर्वांना प्रचार कामास लागण्याचे निर्देश संभाव्य उमेदवारांना देण्यात आले आहेत.