आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Poll 2014 Nomination Last Day

अभूतपूर्व गोंधळाचा शनिवार, शेवटच्या दिवशी अनेकांच्या कोलंटउड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ शनिवारी दुपारी तीन वाजता संपली आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत झालेली बिघाडी आणि शिवसेना - भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या झालेल्या चिरफळ्या... हे उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दोन दिवसांपूर्वी झाल्याने, ऐनवेळी या पक्षातून त्या पक्षात उडी मारणार्‍यांची संख्या वाढली आणि कालपर्यंत गळ्यात भगवे उपरणे घालून फिरणार्‍यांच्या खांद्यावर कमळ चिन्हांकित रुमाल नाही तर घड्याळ - पंजा दिसू लागला. महायुतीतील रामदास आठवले यांच्या रिपाईने अखेर शिवसेनेची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असल्याने ऐनवेळी उमेदवारी जाहीर झालेल्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. त्यात निवडणूक आयोगाने क्लिष्ट करुन ठेवलेल्या उमेदवारी अर्जाची भर होती. शिवसेनेने तिकीट नाकारले म्हणून अनेकांनी भाजपचा पर्याय स्विकारला तर, भाजपमध्येही अशी उडी मारणार्‍यांची कमी नाही. ऐनवेळी अनेकांचे नाव कापले गेल्याने त्यांना आता कोणत्या पक्षाकडून अर्ज भरावा असा प्रश्न पडला.
या गदारोळातही शिवसेनेने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मैत्रीधर्म पाळला आणि त्यांची कन्या पंकजा पालवे-मुंडे यांच्या विरोधात परळीत उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार असलेले किशनचंद तनवाणी यांनी मध्यमधून उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, भगव्या रुमालाला लगेच हिरवा पट्टा जोडून भाजपमध्ये प्रवेश केला. लातूर ग्रामीणमध्ये शनिवारी सकाळी काँग्रेसने उमेदवार बदलला आणि विलासराव देशमूख यांचे धाकटे चिरंजीव धिरज यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, दुपारी तीनपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांची संधी हुकली.
कोणी कुठे मारली उडी
शनिवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा आणि अर्धाच दिवस काम होणार असल्याने पक्षांतर करणार्‍यांनी अधिक घाई केली.
- लातूरचे काँग्रेस प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निलंग्यातून विधानसभेच्या आखाड्यात उडी घेतली.
- काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश्वर बुके यांनी औसा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढण्याचे निश्चित केले.
- औरंगाबाद पश्चिमधून अपक्ष उमेदवार मधुकर सावंत यांना भाजपने तिकीट दिले आहे.
- याच मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची शोधाशोध सुरु केली होती, त्यांनी माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांना तिकीट देण्याची अफवा पसरली मात्र, गाडेंनी आधीच एमआयएमकडून उमेदवारी दाखल केल्याने राष्ट्रवादीला पुन्हा धावा धाव करावील लागली आणि औरंगाबाद महापालिकेतील अपक्ष नगरसेवक मिलींद दाभाडे यांच्या गळ्यात ऐनवेळी उमेदवारीची माळ घातली.
- माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील पारंपरिक भोकर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेली असतानाच, अशोक चव्हाणांनीही त्याच मतदारसंघातून शनिवारी घाईघाईत उमेदवारी दाखल केल्याचे वृत्त काही वाहिण्यांवर झळकले. मात्र, नंतर त्यांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगून माध्यमांमध्येही किती गोंधळची परिस्थिती होती हे स्पष्ट झाले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची बहिण उषा तनपुरे यांनी नगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली.
- चिंचवडचे अपक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
- अमरावतीचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुखही भाजपात दाखल झाले आहेत.
- नागपूर दक्षिणचे काँग्रेसचे आमदार दिनानाथ पडोळे हे राष्ट्रवादीत गेले आहेत.
- पुण्यातले काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत.
- मोर्शीचे अपक्ष आमदार अनिल बोंडे भाजपच्या तिकिटावर लढणार आहेत.
- कोल्हापूरातील काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक यांनी भाजपच्या तिकीटावर दक्षिणमधून उमेदवारी दाखल केली आहे.