मुंबई- महायुतीतल्या जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटण्याचे नाव घेत नाही. बुधवारीसुद्धा महायुतीतल्या घटक पक्षांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांबरोबर स्वतंत्र बैठकांमध्ये चर्चा करून समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. याउलट भाजपच्या नेत्यांनी ‘महायुती तुटल्यास तुमची भूमिका काय राहील? आमच्याकडून
आपल्या काय अपेक्षा आहेत?’ अशी थेट विचारणा घटक पक्षांना केल्यामुळे त्यांच्या काळजीत भर पडली आहे. दुसरीकडे, शिवसेनेनेही स्वबळाची तयारी करताना मित्रपक्षांच्या भूमिकेचीही चाचपणी करत भाजपचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे.
आचारसंहिता जाहीर होऊन आता जवळपास आठवडा होत आला आहे, मात्र राज्यात आघाडीचे महायुतीचे जागावाटप मार्गी लागू शकलेले नाही. भाजपने १३५ जागांची केलेली मागणी शिवसेनेने साफ धुडकावून लावल्याने या दोन्ही पक्षांमधली थेट चर्चा जवळपास थांबली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांची महायुतीतल्या इतर घटक पक्षांशी मात्र वेगवेगळी चर्चा सुरू आहे. बुधवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजू शेट्टी म्हणाले की, भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आपापसातला वाद लवकर संपवावा आणि घटक पक्षांशी चर्चा करून जागावाटप लवकर मार्गी लावावे, अशी विनंती आम्ही उद्धव ठाकरेंना केली आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नेते विनोद तावडे यांच्याशी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रासपचे महादेव जानकर आणि रिपाइंचे अविनाश महातेकर आणि अर्जुन डांगळे यांची रंगशारदा सभागृहात चर्चा झाली. या चर्चेतही महायुतीबाबत लवचिक धोरण आम्ही घेऊ, असे आश्वासन आम्हाला भाजप नेत्यांनी दिल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का रे दुरावा..?