आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Election 2014 News In Marathi, Chhagan Bhujbal Target To Cm

माझ्यावरील आरोपांचे खंडन केले नाही, छगन भुजबळांचेही शरसंधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलबाबत घेतलेले निर्णय वा दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितल्या होत्या. टोलबाबत निविदा काढतानाही त्यांच्याकडे योजनाही पाठवली जात असे, त्यामुळे निविदा प्रक्रिया त्यांना ठाऊकच होती. मात्र विरोधकांकडून या दोन्ही मुद्द्यांवर आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी सरकारचा प्रमुख या नात्याने या आरोपांना उत्तर द्यायला पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट केले.

आघाडीतील जागावाटपाबाबत होत असलेला उशीर, मुख्यमंत्रिपदाची आस, नाशिकचा विकास आणि शिवसेनेतील घडामोडी अशा विविध विषयांवर भुजबळांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

‘राज्यातील टोलनाक्यांची कंत्राटे, दिल्लीतील नव्याने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनप्रकरणी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा वेळी पक्ष तुमच्या पाठीशी होता का?’ या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, ‘टोलमध्ये काहीही झोल झालेला नाही आणि महाराष्ट्र सदनाच्या कामात मी एक रुपयाही खाल्लेला नाही वा एक फूट जमीनही कंत्राटदाराला दिलेली नाही. सध्या आरोप करण्याचे एक फॅड झाले. आरोप केला की बातम्या छापून येतात, न्यायालयात गेले की बातम्या छापून येतात. काही जणांचा प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप असतो. माझ्या पक्षातील नेत्यांना ही बाब चांगलीच ठाऊक होती त्यामुळे त्यांनी माझा बचाव केला. परंतु राज्याचे प्रमुख असूनही मुख्यमंत्र्यांनी मात्र याविषयी गप्प राहायला नको होते.’

उद्धव- राजविषयी...
शिवसेनाप्रमुखांनी ४० वर्षांपूर्वी मला सांगितले होते की, वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवर लक्ष न देता आपले काम करीत राहा. मी आजही त्यांचा सल्ला मानत आहे.

शिवसेना संपणार नाही, असे मी म्हणत होतोच. उद्धवे हे उत्कृष्ट पॉलिसी मेकर आहेत, त्यांनी पक्ष चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. तर राज ठाकरे चांगले परफॉर्मर आहेत.

नाशिक महापालिकेत युतीला दूर ठेवायचे होते, त्यामुळे मनसेला साथ दिली. विधानसभेत मात्र तसे होणार नाही.

राष्ट्रवादी सोडणार नाही
भुजबळ म्हणाले, मी राष्ट्रवादी सोडण्याचा किंवा शिवसेनेत जाण्याचा विचार केला नाही व करणारही नाही. राष्ट्रवादीत मला पूर्ण सहकार्य मिळत आहे. काही जण माझ्या समता परिषदेच्या कामाबद्दलही आरोप करीत होते. परंतु त्यांना ठाऊक नाही की माझ्या या कामाला खुद्द शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे. बिहारमध्ये समता परिषदेने तीन आमदारही निवडून आणलेले आहेत.

मोदींच्या अपयशावर बोट
लोकसभेच्या पराभवाबाबत भुजबळ म्हणाले की, तेव्हाचे गणितच वेगळे होते. मोदी लाटेत भलेभले वाहून गेले. परंतु लोकसभा आणि विधानसभेचे गणित वेगळे असते. नाशिकचा गेल्या पाच वर्षात मी जो विकास केला तो देशातील कुठल्याही शहरात झाला नसेल. मात्र आता प्रचारात विकासापेक्षा मोदी १०० दिवसात कसे अयशस्वी ठरले ते आम्ही जनतेला सांगणार आहोत.

भाजपने बहुजनांना डावलले
‘केंद्राच्या निर्यात धोरणांमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे प्रचारात आमचा भर हा ‘अँटी मोदी’च असणार आहे. ‘लव्ह जिहाद’मधून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यात ९७ टक्के बहुजन आहेत परंतु भाजपने केंद्रात बहुजनांना स्थान दिलेले नाही. पंकजा मुंडेंनाही स्थान दिले नाही. यावरून भाजपाची नीती स्पष्ट होते,’ याकडेही भुजबळांनी लक्ष वेधले.
भाजपात चार, चार मोदी
मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर भुजबळ हसून म्हणाले, ‘सध्या जे दावेदार आहेत त्यांच्यापुढे मी खूप छोटा आहे. मला काहीही अनुभव नाही. मला बोलता येत नाही, राजकीय गणिते कळत नाहीत. भाजपमध्ये मात्र सध्या चार-चार मोदी तयार झाले आहेत. आणि शिवसेनेत तर मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव घेता येणार नाही.’