आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजपची उमेदवारी अस्पष्ट ; देशमुखविरुद्ध शेखावत सामना यंदाही रंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महायुतीतील जागावाटप तिढ्याचा वाद मिटण्याच्या मार्गावर असतानाही जिल्ह्यातील शिवसेना-भाजप उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्यापही झाली नसल्यामुळे उमेदवारीबाबत गूढ निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या आठही मतदारसंघांत शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवाराच्या नावाबाबत स्पष्टता नाही. अडसूळ दर्यापूर मतदारसंघातून गुरुवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
भाजपमध्येही अद्यापपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. मागील अनेक दिवसांपासून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. सुनील देशमुख यांच्या नावाची शहरात जोरदार चर्चा आहे. मात्र, देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबाबत कोणतीही औपचारिकता अद्यापही पूर्ण झाली नाही. त्यामुळे भाजपची उमेदवारी कोणाला, यासंदर्भात गूढ कायम आहे. येत्या २६ सप्टेंबरला सुनील देशमुख जनविकास काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे त्यांच्या पक्षाच्या वतीने कळवण्यात आले आहे. आमदार रावसाहेब शेखावत यांनाही अमरावती मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मागील निवडणुकीत देशमुखविरुद्ध शेखावत ही लढत चांगलीच गाजली होती. त्या वेळी शेखावत यांच्या मातोश्री प्रतिभाताई पाटील या तत्कालीन राष्ट्रपती होत्या. त्यामुळे राष्ट्रपतींचे चिरंजीव रिंगणात उतरल्याने देश- विदेशातील राजकीय तज्ज्ञ आणि प्रसारमाध्यमांचे अमरावतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही देशमुख आणि शेखावत हे दोघेही रिंगणात कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमरावती मतदारसंघाची ही लढत पुन्हा रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे विद्यमान आमदार रिंगणात
जिल्ह्यातीलकाँग्रेसचे चारही विद्यमान आमदारांनाच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याचे काँग्रेसने निश्चित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, तर दर्यापूर आणि अचलपूरमध्ये उमेदवारीबाबत स्पष्टता नाही. अचलपूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांच्यात तिकिटासाठी स्पर्धा आहे. दर्यापूरमध्ये नारायण राणे यांचे कट्टर समर्थक सिद्धार्थ वानखडे, श्रीराम नेहर यांच्यात तिकिटासाठी रस्सीखेच आहे. मोर्शी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानचे रवि राणा यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ शकते.
नितीन गडकरी २९ रोजी शहरात : भाजपचेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या २९ सप्टेंबरला अमरावतीत येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची अमरावती मतदारसंघातील उमेदवारी अद्यापही जाहीर झाली नसल्याने गडकरींच्या दौऱ्यात उमेदवारीबाबत अमरावतीचे िचत्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.
नव्या चेहऱ्यांची उत्सुकता
शिवसेनेच्याताब्यातील अचलपूर मतदारसंघ भाजपने मागितला. मात्र, हा मतदारसंघ भाजपकरिता सोडण्याच्या मानसिकतेत शिवसेनेचे स्थानिक नेते नाहीत. या मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांनी दावा केला आहे; तरीही ऐनवेळी राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी देण्याची तयारी शिवसेनेने चालवली आहे. बडनेरा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय बंड यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, संजय बंड यांना तिवसा मतदारसंघातून लढवून बडनेरातही नवा चेहरा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंड यांनी संघटनात्मक बांधणी चांगली केल्याने त्यांना बडनेरा मतदारसंघ देण्याचीच शक्यता आहे. तिवसा मतदारसंघात विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांच्या भगिनी संयोगिता नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेची उमेदवारी मागितली आहे. दिनेश वानखडे यांनी शिवसेनेची उमेदवारी मागितल्याने तिवसा येथे कोण उमेदवार असणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
भाजपमध्ये संभ्रमावस्था
अमरावती,मेळघाट, धामणगावरेल्वे आणि मोर्शी हे चार मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. धामणगावमध्ये अरुण अडसड किंवा रामदास निस्ताने यांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावतीत भाजपचे आमदार प्रवीण पोटे, जगदीश गुप्ता, तुषार भारतीय, लप्पीसेठ जाजोदिया यांच्यासह सुमारे सोळा जणांनी भाजपची उमेदवारी मागितली आहे. मेळघाटमध्ये भाजपची उमेदवारी कोणाला, हे स्पष्ट नाही अथवा तसे संकेतही कोणत्याच उमेदवाराला देण्यात आले नाही. मोर्शी मतदारसंघात माजी आमदार साहेबराव तट्टे, विद्यमान आमदार डॉ अनिल बोंडे आणि निशांत गांधी यांच्यासह आणखी चार जण इच्छुक आहेत. या चारही मतदारसंघांतील एकाही उमेदवाराला भाजपच्या नेतृत्वाकडून निवडणूक लढण्याचे संकेतही आले नसल्याने संभ्रमावस्था आहे.