आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Election Poll 2014 News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकृत उमेदवारांसमोरील संकट दूर करण्यासाठी भाजपकडून आश्वासने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अधिकृत उमेदवारी मिळाल्याने बंडाचे निशाण फडकावून भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरू शकणाऱ्या १५ ते २० नाराज उमेदवारांचे मन वळवून त्यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याच्या सूचना भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील नेते विधान परिषद, महामंडळावर वर्णी लावण्याचे आश्वासन देत बंडोबांना शांत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळवण्याची व्यूहरचना अमित शहा यांनी आखली आहे. त्यासाठी भाजपने अनेक जागांवर निष्ठावंतांना डावलून 'आयात' नेत्यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकारामुळे नाराज झालेल्या १५ ते २० भाजप नेत्यांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून दाखल केली आहे. काही ठिकाणी भाजपच्या मित्रपक्षातील उमेदवारच त्यांच्यासमोर उभे असल्याचे चित्र आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवाराला अडचणीचे ठरू शकतील, अशा नेत्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावण्यासाठी पक्षातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अमित शहा यांनी ही जबाबदारी ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे आदी नेत्यांवर सोपवली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडोबांनी जर उमेदवारी मागे घेतली तर त्यापैकी काहींचा विधान परिषदेसाठी तर काहींचा महामंडळावर विचार केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक समितीने या बंडखोरांचे मन वळवण्याची जबाबदारी राज्यांनी नेत्यांना विभागून दिली आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत हे उमेदवार माघारी फिरतील, असा आशावाद भाजपच्या एका राष्ट्रीय पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
अडचणीचे ठरणारे उमेदवार
अमरावतीमतदारसंघातून भाजपने डॉ.सुनील देशमुख यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेले डॉ. अविनाश चौधरी हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार होते. परंतु संघाचे कार्यकर्ते असलेल्या चौधरींवर नितीन गडकरी यांनी दबाव टाकल्याने आता ते अर्ज मागे घेणार आहेत. माजी खासदार प्रताप सोनवणे, श्याम गायकवाड, हेमा भिवगडे, बळवंत जाधव, चिंतन जोशी, नरहरी गवई, मदन गायकवाड, अनिल ठाकूर, रामदास पाटील, श्याम दुर्वे, संजय दास्ताने, विठ्ठल रबदादे, राजकुमार पाटील आदींचाही बंडखोरांमध्ये समावेश आहे. त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

(फोटो: भाजपने यंदा प्रचारात वासुदेव कुडमुडे ज्योतिषींचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवारी मुंबईच्या भाजपच्या कार्यालयाबाहेर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत वासुदेवांनी प्रचाराचा शुभारंभ केला. आता हे वासुदेव ज्योतिषी राज्यभर फिरणार आहेत. छाया : संदीप महाकाल)