नवी दिल्ली - हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाल्या आहेत. पंतप्रधान
नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष
अमित शहांसाठी तरी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अमित शहा यांनी सगळ्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन महाराष्ट्रात शिवसेनेशी युती तोडली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही युती तोडण्यास विरोध होता. या निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवाराची घोषणा केली नाही. दोन्ही राज्यांत ३७८ जागांवर भाजप मोदी नावाच्या करिष्म्यावर निवडणूक लढवत आहे. मोदींना फक्त १५ सभा घ्यायच्या होत्या. मात्र शहा यांनी त्यांना ४० सभांसाठी राजी केले. काँग्रेस व राष्ट्रवादीच्याविद्यमान मंत्री आमदारांनाही भाजपने पक्षात प्रवेश दिला तिकीट दिले. महाराष्ट्रातील ६-७ जागा असलेल्या प्रत्येक जिल्ह्याच्या निवडणुकीची जबाबदारी एकेका केंद्रीय मंत्र्यांकडे दिली आहे. तर गुजरातच्या ११ खासदारांकडे सर्वांत कमजोर समजण्यात येणा-या ६६ जागांचा कार्यभार देण्यात आला आहे. कार्यकर्त्यांपासून ते प्रचार वाहनांची सर्व तरतूद गुजरातहून करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र भाजपकडून कोणतीही अपेक्षा किंवा मागणी करू नका, असे गुजरातच्या ११ खासदारांना सांगण्यात आले आहे. मुंबईत गुजराती लोकसंख्या १७ टक्के आहे. ती मते भाजपकडे आकर्षित करण्याचा जोरकस प्रयत्न शहा यांनी केला.
....तरयशाचे श्रेय शहांना : अमितशहा हे शिवसेनेवर थेट नव्हे तर अप्रत्यक्ष टीका करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे छायाचित्रही शहा त्यांच्या सभांमध्ये लावत आहेत. बाळासाहेब देशाचे नेते होते, त्यांच्या पक्षाने त्यांना मुंबईचा नेता करून ठेवल्याची टीका शहा सभांमध्ये करत आहेत. बाळासाहेबांची विचारसरणी केवळ त्यांच्या कुटुंबापुरती मर्यादित का ठेवावी, असा भावनिक प्रश्नही शहा उपस्थित करत आहेत. या स्थितीत भाजप जिंकला तर शहा यांच्या नेतृत्वाला त्याचे श्रेय जाईल. एकेकाळी अडवाणी जेवढे शक्तिशाली होते त्यापेक्षाही जास्त. उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या ८० पैकी ७३ जागा जिंकून त्यांनी पक्षात मोठी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. मात्र आता महाराष्ट्र आणि हरियाणात पक्षाचे सरकार आले नाही तर त्यांची स्थिती बंगारू लक्ष्मण आणि जना कृष्णमूर्ती यांच्यासारखी होईल.