आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Polls Exports View Against Corruption Crime At Bhusawal

एक्सपर्ट व्ह्यू: भ्रष्टाचार, गुंडगिरीचे प्रचारमुद्दे यंदाही ऐरणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकशाहीत पक्ष राहिले नावापुरते
लोप पावली नेत्यांचीही निष्ठा
देशद्रोह्यांनाच मिळू लागली प्रतिष्ठा
लोकशाहीची काय मांडली ही थट्टा

भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध छायाचित्रकार मधू साळी यांची ही कविता आताच्या बदलत्या राजकीय स्वरुपावर अचूक भाष्य करणारी आहे. १९७० पूर्वी निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, विकासात्मक मुद्दे, सामाजिक गरजा हे प्रचाराचे मुद्दे होते. आता वैयक्तिक टीका-टिप्पणीच वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीतही वैयक्तिक आरोपांची परंपरा कायम राहून मतदारांचे मनोरंजन होईल.
भुसावळ मतदार संघात १९७० च्या दशकापूर्वी असलेली पक्षनिष्ठेची भावना आता खुंटीला टांगली गेली आहे. पक्ष आणि संघटनांपेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारण झाल्याने पैशांचा वारेमाप वापर निवडणुकीत वाढला. भ्रष्टाचार बोकाळल्याचे जनतेला दिसू लागल्याने प्रचाराचे मुद्दे बदलले. एकेकाळी पक्षांची ध्येयधोरणे प्रचारसभांतून जनतेपर्यंत पोहोचवले जात. मात्र, गेल्या तीन-चार निवडणुकांपासून भ्रष्टाचार आणि विकासाचा अनुशेष याच मुद्यांवर प्रचारसभा होतात. पालिका आणि लोकसभा निवडणुकीत जाहीर सभांमधून झालेली टिका नागरिकांचे मनोरंजन करणारी ठरली.

अनोळखी उमेदवारही विजयी झाला
प्रचारात आरोप-प्रत्यारोप कमी असायचे. १९६० पूर्वीच्या निवडणुकीत मुंबई येथील रहिवासी नौशेर भरूचा हे जनता पक्षाचे शहरासाठी अनोळखी असलेले उमेदवार निवडून आले होते. पक्ष महत्त्वाचा मानला जाई.
- मधू साळी, ज्येष्ठपत्रकार, भुसावळ

असा बदलला प्रचार
गेल्या२५ वर्षांपूर्वी निवडणुकीत भिंती रंगवून उमेदवारांचा प्रचार होई. घरोघरी जाऊन उमेदवारांची ओळख करून दिली जात होती. यानंतर कापडी फलकांवर उमेदवाराचे नाव, चिन्ह आणि माहिती लिहिण्याचा फंडा आला. सध्या या फलकाचे रुपांतर बॅनर आणि प्लेक्समध्ये झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक प्रचार प्रसार होऊ लागला.

हे असतील मुख्य मुद्दे
भुसावळातप्रामुख्याने देश किंवा राज्य पातळीवरील मुद्यांपेक्षा भ्रष्टाचार, गुंडगिरी, रस्ते, पाणी, वीज, रखडलेला औद्योगिक विकास, ओझरखेडा धरणाचे रखडलेले काम या स्थानिक मुद्यांवर भर राहू शकतो. गेल्या पाच वर्षांमध्ये रखडलेला विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, दीपनगर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील गरजा आणि पालिकेच्या समस्यांवरच खडे फोडले जातील.
प्रचारसभांची होती क्रेझ
शहरातीलनेहरू मैदान, आठवडे बाजार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान (डी.एस. मैदान) या ठिकाणी प्रचार सभा रंगतदार व्हायच्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, इंदिरा गांधी, एस.एम.जोशी, शरद पवार आदींच्या सभांचे आकर्षण होते. पक्षांची ध्येयधोरणे ऐकण्यास लोक गर्दी करायचे. सध्या मात्र गर्दी दिसावी म्हणून रोजंदारीवर श्रोते आणले जातात.