आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls, MNS Issue At Nashik Assembly Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटका बसणार? मनसेची धडपड आता बालेकिल्ला राखण्यासाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘मी भी तुमनाच शे’ अशा शब्दांनी भावनिकतेची साद घालणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा ओसरलेला करिष्मा, लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेले महायुतीचे वारे पाहता नाशिक पश्चिम मतदारसंघात कोण बाजी मारेल, हे बघणे रंजक ठरेल. आमदार नितीन भोसले यांची जागा राखण्यासाठी धडपड सुरू असताना त्यांना सत्ताधारी मनसेकडून महापालिकेच्या रूपाने साथ मिळाली नाही. दुसरीकडे महायुतीचे वारे असले तरी, भाजपकडील या जागेवर शिवसेनेकडून अनेक मातब्बर इच्छुक असल्यामुळे अंतर्गत कलहाचा फायदा भोसले यांना मिळतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. माजी महापौर दशरथ पाटीलदेखील आघाडीकडून उमेदवारीसाठी बाशिंग बांधून आहेत, त्यांना उमेदवारी मिळाली, तर ही लढत लक्षवेधी ठरेल.

गत विधानसभा निवडणुकीत नव्यानेच पश्चिम मतदारसंघ निर्माण झाला. सिडको-सातपूर या कामगार वसाहतीसह आनंदवल्ली, सावरकरनगर, पाथर्डी फाट्यासह इंदिरानगरचा काही भाग असलेल्या सुमारे साडेतीन लाख मतदारसंख्या असलेल्या मतदारसंघात मराठा समाजाचे सर्वाधिक ३५ टक्के मतदार आहेत. ओबीसी, दलित, मुस्लीम, परप्रांतियांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. ६० टक्क्याहून अधिक मतदार हा कसमादे-खान्देशपट्ट्यातील असल्याने प्रादेशिकत्वाचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच भाजप-शिवसेना युतीकडून गेल्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र डॉ.राहुल आहेर यांना उमेदवारी देण्यात आली. पण, मनसेच्या लाटेत हा मुद्दाही निकाली निघाला. सेनेचा प्रभाव असतानाही ही जागा भाजपला सुटल्याने नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे यांनी बंडखोरी केली. तर आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीकडून नाना महाले यांना उमेदवारी मिळाल्याने माजी महापौर दशरथ पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी केली. सर्वाधिक आठ मातब्बर रिंगणात उतरल्याने ही लढत त्यावेळी अतिशय चुरशीची ठरली होती. विद्यमान आमदार भोसले यांची उमेदवारी यंदा निश्चित मानली जात आहे. त्यांनी विकासकामांचा उद‌्घाटनाचा धडकाही लावला. मात्र, लोकसभेच्या निकालात पक्षाची झालेली पिछेहाट, मनपात सत्ता असतानाही एकही भरीव काम झाल्याने मनसे सध्या बॅकफूटवर आहे. महायुतीकडून कसमादे भागातीलच उमेदवार देण्याची शक्यता आहे. आघाडी-युतीच्या अधिकृत उमेदवारांसोबत बंडखोरही रिंगणात उतरल्याने पुन्हा गेल्या वेळेसारखीच ‘खिचडी’ होऊन ही लढत रंगतदार ठरेल.
विजयाला लागला असा ब्रेक
युतीच्याया बालेकिल्ल्याला मनसेने आमदार भोसलेंच्या विजयाद्वारे खिंडार पाडले. पाठोपाठ याच भागात महापालिकेसाठी सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता आले. मात्र, लोकसभा निवडणुकीत येथे मनसे उमेदवार तिसऱ्या स्थानी फेकला गेला होता. ही धोक्याची घंटा ठरू पाहात आहे.

सर्वच पक्ष या परिसरात बंडखोरीतही आघाडीवर
निवडणूक कोणतीही असो, या मतदारसंघातून बंडखोरी करण्यात सर्वच पक्ष आघाडीवर राहिले. गेल्या विधानसभेत आघाडी-युतीच्या चार पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली. महापौरपदाच्या निवडणुकी पूर्वीदेखील जनराज्य आघाडी, माकपचे नगरसेवक गळाला लावण्यात सेनेला यश आले. काँग्रेस नगरसेवकानेही भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींकडे तिकिटासाठी फिल्डींग लावून बसलेले सर्वच पक्षांमधील इच्छुक बंडखोरीसाठी सज्ज झाले आहेत.