आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls News In Marathi, All Political Party Power All District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्तेसाठी खरी लढत भाजप-राष्ट्रवादीतच, वाचा जिल्हानिहाय पक्ष‍ीय बलाबल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या पंधरा वर्षांपासून कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या ताब्यात असलेल्या महाराष्ट्रात यावेळी सत्तापालटाची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र घोडामैदान जवळ येताच ‘मुख्यमंत्रीपदा’च्या हव्यासापोटी युती व आघाडीने ‘राजकीय घटस्फोट’ घेत वेगळी वाट चोखाळली. त्यामुळे आता संपूर्ण राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत.
मित्रपक्षांच्या आधारावर इतकी वर्षे सत्ता उपभोगणार्‍या राजकीय पक्षांच्या नेतृत्वाची यंदा स्वबळावर खरी कसोटी लागणार आहे. राज्याच्या बहूतांश भागात सध्या तरी हेच चित्र दिसून येते.
सध्याचे पक्षीय बलाबल :
एकूण जागा २८८
काँग्रेस ८२
राष्ट्रवादी ६१
शिवसेना ४४
भाजप ४६
मनसे १३
मुंबई शहर
मनसेला जीवदान, शिवसेनेचीच मुसंडी

मुंबईत शहर आणि उपनगरात ३६ मतदारसंघ आहेत. यापैकी १७ जागी कॉंग्रेस, ३ जागांवर राष्ट्रवादी, ५ जागांवर भाजप तर चार जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने १७ तर राष्ट्रवादीने ३ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाने ५ आणि शिवसेनेने ४ जागा जिंकल्या होत्या. मनसेने सहा तर समाजवादी पक्षाने एक जागा जिंकली होती. आघाडी आणि महायुतीच्या माध्यमातून या लढती लढल्या गेल्याने प्रत्येक पक्षाची स्वतंत्र ताकद समोर आली नव्हती. गेल्यावेळप मनसे शिवसेनेच्या बहुसंख्य उमेदवारांच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता. मात्र आता पंचरंगी लढत होणार असून प्रत्येक पक्षाला आता आपली खरी ताकद किती आहे याची जाणीव होणार आहे. शिवसेनेला सर्वच्या सर्व म्हणजे ३६ जागांवर आता दोन्ही कॉंग्रेस, मनसेसह आपला एकेकाळचा मित्र असलेल्या भाजप उमेदवारांशीही टक्कर द्यावी लागणार आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीलाही एकमेकांशी लढत देण्याबरोबरच भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांशीही टक्कर द्यावी लागणार आहे. दुसरीकडे मनसेशी सगळ्यांनाच लढावे लागणार आहे. मात्र अन्य पक्षांप्रमाणे मनसेने कधी कोणाशी युती, आघाडी केलेली नसल्याने स्वबळाची ताकद त्यांना ठाऊक आहे. २००९ मध्ये सहा जागा जिंकून मनसेने शिवसनेच्या तोंडाला फेस आणला
होता.
ठाणे
बाले किकल्ल्यात शिवसेनेचेच वर्चस्व

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ मतदारसंघ आहेत. यापैकी किमान ७ ते ८ जागा शिवसेनेच्या पारड्यात पडू शकतात. डोंबिवलीत शिवसेनासोबत नसल्याने भाजपची जागा संकटात सापडली असून काँग्रेसचे खाते उघडण्याची शक्यताही धूसरच आहे. भाजप आणि राष्ट्रवादीला चार जागांवर विजयाची शक्यता आहे. ठाणे शहरातील तीन आणि कल्याण ग्रामीण या जागांवर शिवसेनेला विजयाची खात्री आहे. तर चार जागा राष्ट्रवादीकडे व दोन जागा ‘सपा’ मिळवू शकते.

पालघर
पालघरमध्ये वाघाची डरकाळी

नव्या पालघर जिल्ह्यात सहा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात बहूजन विकास आघाडीची चलती होती. मात्र आता पुन्हा शिवसेनेचे वर्चस्व वाढू लागले आहे. हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर नालासोपारा, तर बोईसरमधूनन त्यांचे समर्थक विजयावर दावा करत आहेत. पालघरला काँग्रेसचे मंत्री राजेंद्र गावित पुन्हा नशीब अजमावत आहेत. या तिन्ही जागा जिंकण्यासाठी शिवसेना लढत देईल. माकपला डहाणू, तर भाजपला विक्रमगड राखणे शक्य आहे.

रत्नागिरी
शिवसेनेचा गड शाबित

रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा असून त्यापैकी चार जागांवर शिवसेनेचा विजय नक्की आहे. मात्र आता युतीतील फुटीमुळे एका जागेवर राष्ट्रवादी विजय मिळू शकेल. राजापूर, चिपळूण, दापोली या तीन मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार निवडून येऊ शकतात. रत्नाग‍िरीकरही उमेदवार पाहून नव्हे तर धनुष्यबाण पाहूनच मतदान करतात. त्यामुळे नुकतेच राष्ट्रवादीतून आलेले उदय सामंत यांचाही विजय नक्की मानला जातो.
चार वेळा दापोलीमधून न‍िवडून आलेले सूर्यकांत देसाई हेही विजयाचा दावा करतात. या जिल्ह्यात राष्ट्रवादीची सारी मदार आहे ती मंत्री भास्कर जाधवांवर. गुहागरमधून ते पुन्हा निवडून येऊ शकतात. भाजपचा हा पारंपरिक मतदारसंघ. आता युतीच फुट झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी पुन्हा विजयी होऊ शकते.

सिंधुदुर्ग
नारायण राणेंची जागाही धोक्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंचा कुडाळ, राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या दीपक केसरकरांचा सावंतवाडी आणि कणकवली- देवगड मतदारसंघांचा समावेश आहे. कणकवलीबरोबरच कुडाळ व सावंतवाडीही राणेंच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. सावंतवाडीत दीपक केसरकर, कणकवलीत भाजपचे प्रमोद जठार यांचे पारडे जड वाटते.

कुडाळमध्ये राणेंसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
नाईक यांनी ज्या तर्‍हेने कुडाळ मतदासंघ गेल्या ५ वर्षांत बांधला आहे ते पाहता आणि राजन तेली, काका कुडाळकर, संजय पडते, सतीश सावंत हे राणेंचे निवडणुक जिंकून देणारे ब्रेनच आता उरले नसल्याने राणेंचे काही खरे नाही.

रायगड
राष्ट्रवादीला साथ शेकापची

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी आता शेकापला जवळ केले आहे. यावेळी श्रीवर्धन मधून तटकरेंचे पुतणे अवधूत तटकरे उभे राहतील. कर्जतमधून राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना पुन्हा जागा मिळणार आहे. या दोन्ही जागा राखण्यासाठी राष्ट्रवादीला शेकाप मदत करेल. तर पेण, उरण, अलिबाग या जागांवर शेकापला राष्ट्रवादीची मदत होईल. कर्जत, उरण येथे शिवसेना बाजी मारण्याची चिन्हे आहेत. तर पनवेलमध्ये भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी होतील.

पुणे
शहरात भाजप, जिल्ह्यात राष्ट्रवादी

२१ आमदार असलेल्या पुणे जिल्ह्यात कोथरुड, हडपसर, पुरंदर राखण्यासाठी शिवसेनेला पराकाष्ठा करावी लागेल. कॉंग्रेसचे मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही इंदापूर राखण्यासाठी झगडावे लागेल. कॉंग्रेसचे संग्राम थोपटे यांच्या अडचणीही वाढल्यात. कॅन्टोन्मेंटमधील कॉंग्रेस रमेश बागवे हे मात्र सुरक्षित आहेत. अजित पवार (बारामती), दिलीप वळसे (आंबेगाव), वल्लभ बेनके (जुन्नर), अशोक पवार (शिरुर), रमेश थोरात (दौंड), दिलीप मोहिते (खेड) हे जागा राखतील. जागा पुन्हा जिंकू शकतील. इंदापूर, भोर, पर्वती, हडपसर या जागा ताब्यता घेण्यावर अजित पवारांचा भर असेल.
सांगली
बहुरंगी लढतीने तीनही मंत्री सुरक्षित

आठही मतदारसंघांत बहुरंगी लढतींचा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना फायदाच होण्याची शक्यता आहे. शिराळ्यात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढत होईल. इस्लामपूरमध्ये जयंत पाटील व पलूसमधून पतंगराव कदम यांचा मार्ग सुकर झाला आहे. सांगलीत भाजप आमदार संभाजी पवार उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढतील. आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार दिल्यास आर. आर. यांना फायदा होईल. येथे काँग्रेसची ताकद तोकडी आहे. त्यामुळे भाजपशी सरळ लढत झाल्यास आर. आर. पाटील यांना कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जतमध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याने भाजपला येथे पुन्हा संधी आहे. मिरज मतदारसंघात बहुरंगी लढत पाहायला मिळेल. काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. गेल्यावेळी भाजपला राष्ट्रवादीची मदत होती. या वेळी त्यांचा स्वतंत्र उमेदवार असल्याने आणि शिवसेनेचीही ताकद असल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

सातारा
राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम

जिल्ह्यातील आठपैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तीन अपक्षांपैकी दोन राष्ट्रवादीचे तर एक कॉंग्रेसचा सहयोगी राहिला आहे. कॉंग्रेसला एक जागा मिळाली होती. आता दक्षिण कराडमधून मुख्यमंत्री रिंगणात आहेत, त्यांना कॉंग्रेसचेच आमदार विलास उंडाळकरांचा विरोध आहे. तरीही ही एक जागा मिळण्याची कॉंग्रेसला आशा आहे. अन्य ठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीचाच वरचष्मा राहण्याची चिन्हे आहेत. शिवसेना व भाजपला खाते उघडणे अशक्य.

औरंगाबाद
शिवसेनेचे बळ वाढेल

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ आहेत. त्यापैकी कॉंग्रेसकडे तीन तर शिवसेनेकडे दोन मतदारसंघ आहेत अपक्ष दोन तर राष्ट्रवादी व मनसेकडे प्रत्येकी एक मतदारसंघ आहे. दरम्यानच्या काळात एक अपक्ष भाजपात तर एक शिवसेनेत गेले, तर मनसेचा आमदार शिवसेनेत आला आहे. कॉंग्रेस एक जागा गमावून दोन जागा राखू शकते. शिवसेनेच्या जागा दोनवरून चार वर जाऊ शकतात. भाजप व राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा पटकावू शकते.मनसेने जिल्ह्यात सर्वच मतदारसंघात उमेदवार दिले असले तरी त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. ‘एमआयएम’ने औरंगाबादेतील मुस्लिमबहूल मतदारसंघात उमेदवार उभे केल्याने ते कॉंग्रेसला डोकेदुखी ठरू शकते.

बीड
भाजपचे संख्याबळ वाढेल

जिल्हयात सहापैकी पाच जागा राष्ट्रवादीकडे तर एक भाजपकडे आहे. यंदा पंचरंगी निवडणुकीचा फायदा आष्टी, परळी, माजलगाव, केजमध्ये भाजपला तर बीड, गेवराईमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे.

एकेक जागा जिंकण्यासाठी सज्ज झालेले आणि सुरवातीपासूनच मतदार संघात वातावरण तयार केलेले असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनुकुलता दिसेत. परंतु, जनतेत विरोध असल्याचेही त्यांच्यापासून लपून राहिलेले नाही.

जालना
मतविभाजनामुळे राष्ट्रवादी संकटात

बदनापूर, जालना आणि भोकरदनमध्ये बहुरंगी लढतीमुळे चित्र अस्पष्ट आहे. घनसावंगीत राजेश टोपे यांचे पारडे जड मानले जाते. परतूरमध्ये भाजप तर मंठ्यात शिवसेनेची पकड आहे. जालन्यात कॉंग्रेसकडून आमदार कैलास गोरंट्यालसह मातब्बर उमेदवारांसह रिंगणात आहेत. बदनापूरमध्ये भाजपची चांगली ताकद असल्याने शिवसेना, राष्ट्रवादीला मतविभाजनाचा फटका बसू शकतो. भोकरदनमध्ये राष्ट्रवादीलाही मतविभाजनाचा फटका बसू शकतो.

नांदेड
अशोक चव्हाणांच्या वर्चस्वाला धक्का

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातही नऊही विधानसभा मतदारसंघात सध्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अपक्ष आमदारही आघाडीचेच सहयोगी होते. मात्र आता भास्करराव खतगावकर, माधवराव किन्हाळकर व सूर्यकांता पाटील पक्षात आल्याने भाजपचे बळ वाढले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला काही जागांवर फटका बसून अशोक चव्हाणांच्या एकहाती सत्तेला काही ठिकाणी सुरूंग लागण्याची चिन्हे आहेत.

नांदेड दक्षिण मतदार संघात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक दिलीप कंदकुर्ते यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अामदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा ‘एमआयएम’ला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नांदेड उत्तर मतदार संघात राष्ट्रवादीने डाँ. सुनिल कदम यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नायगाव मतदार संघात वसंत चव्हाण व बापूसाहेब गोरठेकर यांच्यात परंपरागत लढत होईल. किनवट मतदार संघात राकाँचे प्रदीप नाईक यांच्या विरोधात सेनेचे डाँ. बी.डी.चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोघेही बंजारा समाजाचे प्रतिनिधी असल्याने या मतदार संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. लोहा मधून प्रताप पाटीलचिखलीकर (सेना), रोहिदास चव्हाण (मनसे) व शंकरअण्णा धोंडगे (राकाँ) यांची उमेदवारी जाहीर झाली. भाजपा मुक्तेश्वर धोंडगे यांना उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. हे चौघेही मराठा समाजाचे आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने माधवराव पांडागळे अथवा डाँ. श्याम तेलंग यांना उमेदवारी दिल्यास मराठा मताच्या विभाजनाचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. देगलूर मतदार संघात राष्ट्रवादीने मारोती वाडेकर यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या मतात विभाजनाचा धोका आहे. याचा लाभ शिवसेनेचे सुभाष साबने यांना होण्याची शक्यता आहे. मुखेडमध्ये विद्यमान आमदाराविरोधात असलेल्या नाराजीचा फायदा भाजपाला होतो की, राष्ट्रवादीला हे चित्र अद्याप स्पष्ट नाही.

परभणी
राजकीय समीकरणे बदलणार

परभणी शहरात शिवसेनेची लढाई आता सर्वच आघाड्यांवर राहणार आहे. पाथरीत बिघाडीने चित्र अधिकच बिघडू लागले आहे. जिंतूरमध्ये आमदार रामप्रसाद बोर्डीकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांची थेट लढत होईल. गंगाखेडमध्ये तर चारही पक्षांचे आव्हान विद्यमान आमदार सीताराम घनदाट यांना पेलावे लागणार आहे. शिवसेनेचे उमेदवार अद्याप आज ऐनवेळी निश्चित होतील. शिवसेनेचे डॉ.शिवाजी दळणर रिंगणात येण्याची शक्यता आहे.

हिंगोली
अनिश्चिततेमुळे इच्छुकांनी मैदान सोडले

हिंगोली येथे राष्ट्रवादीकडून तिकीट मिळविण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर व त्यांचे पुत्र भय्या पाटील, दिलीप चव्हाण आदी स्पर्धेत होते. परंतु ताज्या घडामोडींमुळे पाटील पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला प्राधान्य न देता इतर पर्याय शोधले आहेत. त्यामुळे माजी नगराध्यक्ष चव्हाण यांच्यावर लढण्याची वेळ आली.

आघाडी आणि महायुतीत झालेल्या बिघाडीमुळे उमेदवारांची संख्या वाढली तरी अनिश्चिततेमुळे लढण्यास उमेदवारांची मानसिकता राहीली नाही.

अहमदनगर
दिग्गजांची डोकेदुखी वाढली

नगर जिल्ह्यात १२ मतदारसंघ आहेत. सर्वच मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तरीही गेल्यावेळच्या आघाडी - सात, तर युती - पाच अशा बलाबलात मात्र फारसा बदल होण्याची शक्यता नाही. श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते भाजपमध्ये आल्याने तेथे भाजपची ताकद वाढली आहे. कर्जत व राहुरीत भाजपचे आमदार आहेत. तेथे शिवसेनेकडे चांगले उमेदवार नाहीत. अशीच स्थिती जेथे शिवसेनेकडे जागा होत्या तेथे भाजपची आहे.

नाशिक
मोदी लाटेचा झिरप अजूनही टिकून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलेच तर त्याचा झिरप थेट नाशिक जिल्ह्यातही खोलवर पोहोचू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्था असो की ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावपातळीवर पाळेमुळे घट्ट रोवलेली असल्याने येत्या निवडणुकीत या दोहोंमध्येच खरी चुरस होईल, असे सकृतदर्शनी दिसते. अंतिमत: १५ वर्षांचा प्रदीर्घ सत्ताकाळ हाच या पक्षाच्या मुळावर येण्याचे संकेत मिळत आहेत.

जळगाव
राष्ट्रवादी कॉंग्रेससमोर आव्हान

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीकडे सहा, भाजप आणि शिवसेनेकडे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसकडे एक मतदारसंघ आहेत. आता बहुरंगी लढतीमुळे राष्ट्रवादीपुढे आव्हान वाढले असून विद्यमान जागा राखणेही त्यांना अवघड होईल. एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्या मतदारसंघांतही बहुरंगी लढती होणार आहेत. चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, जळगाव ग्रामीणवर राष्ट्रवादीने लक्ष केंद्रित केले असून रावेरमध्ये राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मतांवर होळा आहे.

धुळे
काँग्रेस-राष्ट्रवादीला सरळ संधी

युती तुटल्याचा फटका शिवसेना-भाजपला होईल तर काँग्रेसच्या जागा वाढू शकतात. धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये चौरंगी लढती होतील. त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीलाच फायदा होऊ शकतो. भाजपची साक्री, शिरपूर, धुळे ग्रामीण व शहर या चारही मतदारसंघांमध्ये फारशी ताकद नाही. हीच अवस्था शिवसेनेची आहे. याउलट या सगळ्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसने यापूर्वी उमेदवार दिले होते. त्यातून काहींना यशही मिळाले आहे.

नंदुरबार
खरे प्रतिस्पर्धी भाजप-काँग्रेसच

नंदुरबारमध्ये शहरात काँग्रेसचे तर ग्रामीण भागात भाजपचे विजयकुमार गावितांचे वर्चस्व आहे. डॉ गावित यांच्याविरोधात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या मुद्दयावर काँग्रेस यंदाची निवडणूक लढवणार आहे. डॉ गावित यांना पराभूत करणे मात्र सोपे नाही. नवापूरमध्ये काँग्रेसचे सुरूपसिंग नाईक विरूध्द राष्ट्रवादीचे शरद गावित यांच्यातच खरी लढत आहे. अक्कलकुवात काँग्रेसच्या के.सी. पाडवी विरूद्ध इतर पक्ष असा सामना होईल.

अकोला
भाजप, भारिप- बहूजन महासंघाला संधी

अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या प्रभावाचा अभाव आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत दुहीचा फायदा भाजप आणि भारिपला मिळु शकतो. अकोला पश्चिममधील मुस्लिम मतदान कॉंग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. पूर्वमध्ये मराठा समाजाची गठ्ठा मते आहे. त्यांच्या मतविभाजनाचा भारिपला फायदा होऊ शकतो. बाळापूरमध्ये भाजपला लाभ होईल. अकोटमध्ये कॉंग्रेस- भारिप लढत होईल. तर राखीव मूर्तिजापूरमध्ये भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर
तुल्यबळ उमेदवार देतानाच दमछाक

जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप, जनसुराज्य शक्ती व स्वाभिमानी यांची सर्वच सर्व १० मतदारसंघांत ताकद नाही. केवळ शिवसेना, भाजपलाच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादीलाही सर्व ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे माघारीपर्यंत उसनवारी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १० जागांपैकी राष्ट्रवादी ३, काँग्रेस २, शिवसेना ३, भाजप १ आणि जनसुराज्य अशी गेल्या निवडणुकीतील स्थिती होती.

सोलापूर
भाजपचे सर्वाधिक नुकसान

सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघ आहेत. त्यापैकी ४ जागा राष्ट्रवादीकडे तर प्रत्येकी दोन जागा कॉग्रेस- भाजपकडे आहेत. शेकाप एका जागी तर अपक्ष २ जागांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत मतविभागणीचा धोका भाजप, शिवसेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही बसू शकतो. तरीही कॉंग्रेस व राष्ट्रवादी अस्तित्व कायम राखतील, अशी आशा आहे. शिवसेनेला ग्रामीण भागात संधी आहे तर भाजपची पंचाईत झाली आहे.

लातूर
आघाडी, भाजपच्या दोन जागा वाढतील

लातूर जिल्ह्यातील सहा पैकी चार जागा कॉंग्रेस, एक भाजप आणि एक राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेस लातूर ग्रामीणव निलंगा या जागा गमावण्याची शक्यता आहे, तर भाजपला विजयाची संधी आहे. लातूर शहर आणि आशात काँग्रेसची स्थिती बरी आहे. उदगीरमध्ये भाजपाची जागा राखायची असेल तर सुधाकर भालेराव यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा लागेल. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांच्याविषयी नाराजी आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपाचा घटक पक्ष असलेल्या रासपात गेलेले विनायक पाटील विजयाच्या जवळ आहेत. माञ भाजपात बंडखोरी झाली तर त्यांना झगडावे लागेल. निलंग्यात काँग्रेसला भाजप पराभूतकरेल असे चिञ असले तरी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादीत येऊन उमेदवार झालेले बसवराज पाटील नागराळकर चमत्कार घडवू शकतात. लातूर शहरची सोपी असलेली जागा राखण्यासाठी अमित देशमुख यांना घाम गाळावा लागणार आहे. राष्ट्रवादीने त्यांना पराभूत करण्यासाठी फिल्डींग लावली आहे. भाजपाचे शैलेश लाहोटी मैदानात उतरल्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे.

उस्मानाबाद
शिवसेना, राष्ट्रवादीच प्रभावी

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष प्रभावी ठरतील, असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधी वातावरण होते. मात्र आता मतविभाजनात राष्ट्रवादीची स्वत:ची घडी बसू शकते.

कळंब, भूम, परंडा, उमरगा तालुक्यात शिवसेनेला फायदा होऊ शकतो. जिल्ह्यात पक्ष म्हणून स्थानिक संस्थांमध्ये राष्ट्रवादी तर विधानसभा-लोकसभेत शिवसेनेला मिळणारी मतांची संख्या सर्वाधिक असल्याने या दोन्ही पक्षालाच आता फायदा होईल.

बुलडाणा
भाजप, काँग्रेसला फायदा

जिल्ह्यातील जळगाव जामोद, चिखली, आणि मलकापूर येथे भाजपला तर खामगाव आणि बुलडाणा येथे कॉंग्रेसचे पारडे जड असू शकते. मलकापूरमध्ये भाजपाचे चैनसुख संचेती यांची बाजू वरचढ आहे. जळगाव जामोदमध्ये भाजपाला निवडणूक जड जाईल. मेहकरमध्ये शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. सिंदखेड राजामध्ये राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो. खामगावात काँग्रेसचे आमदार दिलीपकुमार सानंदा यांना पुन्हा संधी मिळेल.

वाशिम
भाजपला फायदा

वाशीममध्ये भाजपच्य विद्यमान आमदाराला यंदा फुटीचा फटका बसू शकतो. या ठिकाणी कॉंग्रसेने सक्षम उमेदवार दिल्यास त्यांना संधी मिळू शकते. कारंजा-मानोरात शिवसेनेला फटका बसणार आहे. या भागात भाजपचा प्रभाव वाढल्याने त्यांचा फायदा होऊ शकतो. रिसोडही भाजपला लाभ मिळू शकतो. या निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघात बाहेरचा उमेदवार लादणार्‍या पक्षाला मतदारांची पसंती मिळणे अवघड आहे.

अमरावती
भाजपची मते वाढतील

जिल्ह्यातील अन्य सातही मतदारसंघात भाजपा आणि अपक्षांना फायदा होऊ शकतो. युतीच्या मतदारांचा कल हा शिवसेनेपेक्षा भाजपकडे अधिक आहे. अचलपूरमध्ये पुन्हा अपक्ष बच्चू कडूंचा प्रभाव पडू शकतो. मेळघाट तर दर्यापुर हे राखीव मतदारसंघ आहेत. तर अचलपुर, धामणगाव, मोर्शी येथे मराठा आणि कुणबी समाज निर्णायक ठरतो. अमरावती आणि बडनेरामध्ये मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते आहेत. बडनेरा, दर्यापुर वगळता शिवसेनेकडेही उमेदवार नाहीत.

नागपूर
भाजपचा वरचष्मा कायम

नागपूर शहरातील सहा मतदारसंघापैकी चार जागा भाजपकडे तर दोनन जागा कॉंग्रेसकडे आहेत. या शहरातशिवसेना व राष्ट्रवादीचा प्रभाव नाही. मंत्री नतीन राऊत यांच्या उत्तर नागपूरसह मध्य नागपूर व पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपातच खरी लढत होईल. कामठी, हिंगणा आणि उमरेड येथे भाजपचे तर सावनेरात कॉंग्रेसचे आमदार आहते. कामठी, उमरेड, व सावनेरमध्ये भाजपला लाभ मिळू शकतो. काटोल व रामटेक येथे तिरंगी लढत होईल.

यवतमाळ
कॉंग्रेसची तयारी, इतरांची शोधाशोध

यवतमाळ जिल्ह्यात सात मतदार संघ आहेत. पैकी पाच आमदार कॉंग्रेंसचे व प्रत्येकी एक शिवसेना, राष्ट्रवादीचाआहे. राष्ट्रवादीचे फारसे नेतृत्व इथे तयार होऊ शकले नाही. कॉग्रेसचे वामनराव कासावार, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, विजय खडसे, नंदीनी पारवेकर यांच्यासमोर चौरंगी- पंचरंगी लढतीचे आव्हान असेल. पुसद येथे राष्ट्रवादीचे मनोहर नाईक तसेच दिग्रसमध्ये शिवसेनेचे संजय राठोड सुरक्षित आहेत.

वर्धा
भाजपचा पगडा शक्य

वर्धा जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. वर्ध्यात अपक्ष सुरेश देशमुख (राष्ट्रवादी), हिंगणघाटमधून शिवसेनेचे अशोक शिंदे, देवळीतून राज्यमंत्री रणजित कांबळे तर आर्वीत भाजपचे दादाराव केचे आमदार आहेत. आता वर्ध्यात सुरेश देशमुख, काँग्रेसचे शेखर शेंडे आणि भाजपचे राणा रणनवरे अशी तिरंगी लढत होईल. तेली आणि कुणबी समाजाचे समीकरण निर्णायक ठरू शकते. हिंगणघाटात शिवसेनेचे मदार अशोक शिंदे यांचा भाजपशी सामना होण्याची शक्यता आहे.

भंडारा
शिवसेना, भाजप जैसे थे

भंडारा जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहेत. तुमसरमध्ये काँग्रेस, भंडाऱ्यात शिवसेना आणि सकोलीत भाजपचा आमदार आहे. तुमसरमध्ये भाजपचा प्रभाव असला तरी जातीय समीकरणे लक्षात घेता भाजप, काँग्रेस आणिअपक्ष राजेंद्र पटले अशी लढत होऊ शकते. भंडाऱ्यात शिवसेनेचा प्रभाव कायम असला तरी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व बसपाही लढत देऊ शकते. साकोलीत शिवसेना तसेच बसपाचा प्रभाव नाही. त्यामुळे भाजप व दोन्ही कॉंग्रेसमध्येच लढत होईल.

गोदिंया
भाजपचा प्रभाव वाढेल

गोंदिया, आमगाव येथे काँग्रेस तर अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा मतदारसंघांवर भाजपचा ताबा आहे. प्रभावाच्या बाबतीत जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असा क्रम लावला जातो. शिवसेनेचे मात्र अस्तित्व नगण्य आहे.

गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षाबेन पटेल रिंगणात उतरल्यास कॉंग्रेससमोर आव्हान असेल. तिरोडात भाजप आणि राष्ट्रवादी तर आमगाव येथे काँग्रेस आणि भाजप लढत होईल. अर्जुनी मोरगावात भाजपचे पारडे जड वाटते.

चंद्रपूर
भाजप- कॉंग्रेसचीच लढत

चंद्रपूर, बल्लारपूर आणि ब्रह्मपुरीमध्ये भाजप तर राजुरा, चिमूर आणि वरोरा या मतदारसंघात कॉंग्रेसचे आमदार आहेत. शिवसेनेचा प्रभाव फक्त वरोरा पट्ट्यात आहे. चंद्रपूरमध्ये पुन्हा भाजप आणि काँग्रेसची थेट लढत होईल.बल्लारपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचा विजय सुकर मानला जातो. ब्रह्मपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा मुकाबला भाजप व राष्ट्रवादीशी, वरोरामध्ये काँग्रेस-शिवसेनेत आणि चिमूरमध्ये भाजप- काँग्रेस लढती होतील.

गडचिरोली
कॉंग्रेस, भाजपसह बसपालाही फायदा

गडचिरोली जिल्ह्यात तीन मतदारसंघ आहेत. गडचिरोली व आरमोरीत काँग्रेसचे तर अहेरीत अपक्ष आमदारआहेत. सद्यस्थितीचा काँग्रेस, भाजप व बसपाला फायदा होऊ शकतो. गडचिरोलीत काँग्रेस, भाजप आणि बसपा तिरंगी लढत होईल. आरमोरीत काँग्रेस मजबूत वाटत असली तरी शिवसेनेचे आव्हान असेल. अहेरी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि अपक्ष आमदार दीपक आत्राम असा चौरंगी मुकाबला होईल. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरेल.