मुंबई- "महायुती तुटू नये अशी आमची इच्छा आहे. पण, आता वाट तरी किती पाहायची? सोमवारी सायंकाळपर्यंत तोडग्याची आम्हाला आशा आहे. तोपर्यंत निर्णय न झाल्यास स्वळावर निवडणुकांची तयारी करायची, असा आमचा इरादा असून तोडग्यासाठी शिवसेना-भाजपला शेवटचा २४ तासांचा अवधी दिल्याची माहिती "स्वाभिमानी'चे नेते सदाभाऊ खोत आणि "रासप'चे महादेव जानकर यांनी दिली.
शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपांचे त्रांगडे गेले आठ दिवस सुरू आहे. त्यामुळे त्रस्थ झालेल्या दोन्ही घटक पक्षांनी रविवारी निर्वाणीचा इशारा दिला. महायुती तुटल्यास स्वाभिमानी आणि रासप एकत्रित निवडणुका लढवू शकतात, असा खुलासाही जानकर यांनी केला.
युतीचे काही ठरत नसल्यामुळ आमच्यावर आमच्या संभाव्य उमेदवारांचा दबाव वाढत चालला आहे. मतदारसंघात जाऊन तयारी करावी लागणार आहे. जागावाटप लांबल्यास उमेदवारी अर्ज भरण्यास अवधी अत्यल्प मिळणार आहे. त्यामुळे सोमवारी तोडग्याची वाट पाहायची आणि गावी परतायचे, असा आम्ही निर्णय घेतल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली.
मतभेद नाहीत : रिपाइं, रासप, स्वाभिमानी आणि शिवसंग्राम संघटना हे चार पक्ष सध्या युतीबरोबर आहेत. त्यामुळे पूर्वीच्या शिवसेना-भाजप युतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून महायुती संबोधले जाते. "आम्हा चारही घटक पक्षांना विधानसभेसाठी १८ जागा देण्याचे शिवसेना-भाजपने तत्वत: मान्य केले आहे. तिढा केवळ शिवसेना-भाजपमधील जागांचा आहे, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
परिषद घेणार नाही
छोटा का असेना माझा पक्ष आहे. चार राज्यात आम्ही निवडणुका लढवत आहोत. त्यामुळे सन्मानाने जागा मिळतील याची खात्री आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत
आपण विधानपरिषदेवर जाणार नसल्याचे जानकर म्हणाले.
आमचा सन्मान राखा
‘घटक पक्षांना कमी जागा देण्यावर शिवसेना- भाजपचे मतैक्य आहे. हे चांगले नाही. दोन्ही पक्षांच्या समाधानातून युती टिकावी तसेच आम्हालाही योग्य जागा मिळाव्यात’, असे शिवसंग्रामचे विनायक मेटे म्हणाले.