आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls, RPI Leader Ramdas Athavale News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व समाजघटकांना रिपाइंत सामावणार; खासदार रामदास आठवले यांचा निर्धार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘रिपब्लिकन पक्ष हा फक्त दलित समाजापुरता मर्यादित ठेवायचा नसून समाजाच्या सर्व घटकांना त्यात सहभागी करून घेत आहोत. त्यासाठी पक्षाची ब्राह्मण आघाडी, मराठा आघाडी, ओबीसी आघाडी तयार केली असून त्या माध्यमातून कामे सुरू करण्यात आली आहेत,’ असे सांगत रिपाइं नेते खासदार रामदास आठवले यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा मांडला.
"दिव्य मराठी' कार्यालयात संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी युतीच्या भवितव्याबाबत भाष्य तर केलेच, पण त्यासोबत महायुतीचा घटक पक्ष म्हणून आपली स्वतंत्र भूमिकाही स्पष्ट केली. चळवळी संपत आल्यात का?, या प्रश्नावर ते म्हणाले की, भावनिक विषयांवर चळवळी होत असतात; पण फक्त मोर्चे काढून भागत नाही. आता प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन जावे लागणार आहे.

रिपब्लिकन पक्षही फक्त दलित समाजापुरता नसावा यासाठी समाजातील सर्व घटकांना त्यात सामावून घेतले जात आहे. आज राखी सावंतसारखी अभिनेत्री पक्षात आली आहे. शिवाय अभिनेता हिमांशू सोना, निर्माती सोनाली सिंग हेही रिपब्लिकन पक्षाला जोडले गेले आहेत. ब्राह्मण, मराठा, ओबीसी, मायनाॅरिटी अशा आघाड्या स्थापन करून त्या त्या समाजाला जोडले जात आहे. या समाजांच्या मागे रिपब्लिकन पक्षाची ताकद लावून पक्ष वाढवण्यात येणार आहे. त्याला यश येईल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

कोण म्हणतो करिष्मा नाही
उद्धव ठाकरे यांच्याकडे करिष्मा नाही, पण संघटन आहे, भाजपकडे मोदींचा करिष्मा आहे, पण संघटन नाही या चर्चेबाबत आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे करिष्मा नाही, असे कोणी म्हणत असले तरी ते खरे नाही. ते सोबर नेते आहेत, अतिरेकी भूमिका ते घेत नाहीत. कुठलाही निर्णय ते समजुतदारीने घेतील यात शंका नाही. राज ठाकरे बाळासाहेबांसारखे बोलतात, मात्र तसे वागत नाही. उद्धवांना तसे बोलता जरी येत नसेल तरी ते बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात, अशा शब्दात आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुखांचे कौतुक केले.

नितीन गडकरीही होऊ शकतात मुख्यमंत्री
‘तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल?’ या प्रश्नावर आठवले म्हणाले, आम्हाला उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस या दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्री म्हणून चालेल. नितीन गडकरीदेखील राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे ते म्हणाले. राज्यात येणार का, या प्रश्नावर त्यांनी साफ शब्दांत ‘नाही’ म्हणून उत्तर दिले; पण मी जर राज्यात असतो तर निश्चितच उपमुख्यमंत्रिपद मागितले असते, असेही ते म्हणाले. रिपाइंला किती जागा हव्या आहेत, असे विचारले असता मराठवाड्यातील दोन जागांसह आम्ही दहा जागांवर दावा केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकांना हवाय महागाईतून दिलासा
नरेंद्र मोदी यांच्याकडे करिष्मा असल्याचे मान्य करीत आठवले म्हणाले की, लोकांना आता काम हवे आहे. महागाई कमी करायला हवी. लोकांना दिलासा हवा आहे. खालच्या माणसाला वर आणणारी अर्थव्यवस्था विकसित केली पाहिजे. काँग्रेसने ते केले नाही म्हणून जनतेने त्यांना नाकारले, असेही ते म्हणाले.
खासदार केले म्हणजे भाजपचा गुलाम नाही
महायुतीत शिवसेना जवळची की भाजप, या प्रश्नावर ते म्हणाले की, युती म्हणून दोन्ही पक्ष मला जवळचे आहेत; पण भाजपने मला खासदार केले म्हणजे आम्ही त्यांची गुलामगिरी पत्करली, असा अर्थ होत नाही. त्यांना आम्ही ४२ जागी निवडून येण्यासाठी मदत केली आहे हे नाकारता येणारच नाही.