आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिंगण: 'हाता'वरचं घड्याळ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या साक्षीने पुलोदस्वामी साहेबांनी घड्याळाला नारळपाणी पाजून प्रचाराला सुरुवात केल्याच्या वार्तेने ‘हात’करांच्या छावणीत चिंतेचे वातावरण होते. त्यातच इटलीसम्राज्ञी पक्षश्रेष्ठीस्वामिनी परदेशी गेलेल्या. राजीवपुत्र, सोनियासूत झोपडीफेम राजपुत्र राहुलबाबांचा ठावठिकाणी माहिती नसल्याने ‘हात’करांच्या चिंतेत भर पडली. छावणीत कोकणकेसरी राणेदादा, प्रदेशाध्यक्ष माणकोजीराव, नगरकर सरदार बाळासाहेब, सांगलीकर सरदार वनप्रेमी पतंगराव अशी खाशी मंडळी जागावाटपाचा सारीपाट मांडून बसलेली. तेवढ्यात केसांचा कोंबडा ठीकठाक करत कर्‍हाडभूषण, श्रेष्ठीमान्य राजेश्री दिल्लीरिटर्न पृथ्वीबाबा तेथे दाखल झाले.

चेहरा व गळ्याच्या सर्व शिरा जास्तीत जास्त आखडत बाबांनी विचारले, ‘काय राणेदादा, काय चाललंय?’
‘काय चालणार, बाबा, जागावाटप, दुसरं काय?’
‘तुम्ही लई मनावर घेतलेलं दिसतंय’
‘तसं नाय बाबा, माझ्या लाडक्या पोराचा पराभव लय जिव्हारी लागला माझ्या. त्या केसरकरानं केसानं गळा कापला माझा.’
‘बरे ते जाऊ द्या, काय म्हणतात घड्याळकर सोयरे ?’
‘मागं हटायला तयार नाहीत’, नगरकर उत्तरले.
‘काय नाय वो, त्यांच्याशी बोलण्यात काय पॉइंट नाय’, पतंगरावांनी काटाकाटी केली.
‘१४४ नाय तर काय नाय असे म्हणतात ते’ माणकोजीरावांनी माहिती पुरवली.
‘राहुलबाबांना कळवले का?’ बाबांनी विचारले.
‘त्यांना माहिती आहे का महाराष्ट्रात निवडणुका आहेत याची‘, राणेदादांनी खास मालवणी टाकला.
तसे बाबांनी डोळे वटारले व म्हणाले, ‘श्रेष्ठीपुत्र आहेत ते. त्यांना सर्व नॉलेज असते, नाही का हो पतंगराव?’
पतंगरावांना मस्त डुलकी लागली होती, दचकत जागे होत पेंगुळले डोळे किलकिले करत पतंगरावांनी मान डोलावली व पुन्हा निद्रादेवीच्या अधीन झाले.
माणकोजीरावांनी पुन्हा आकडेमोड केली. तसे बाबा म्हणाले, ‘लढू स्वबळावर, काय व्हायचे ते होईल.’
आपली सर्व चाचपणी झाले आहे,’ माणकोजीराव म्हणाले.

तेवढ्यात चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकली :
अशोक चव्हाणांना पेड न्यूजप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा....
बातमी ऐकताच.. बाबा, राणेदादा, नगरकर, सांगलीकर, माणकोजी यांचे चेहरे खर्रकन उतरले...
छावणीतील हे सर्व फुटेज दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांनी पाहिले व मॅडमना निरोप कळवला -
हातावर घड्याळ बांधल्याशिवाय, चांगली वेळ येणार नाही.
-रिंग मास्टर