आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Polls:state Assembly Elections 2014 Surveys Suggest Advantage BJP

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणनिती: युतीत राहिल्यास ११० अन‌् स्वबळावर ११५ जागांची भाजपला आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‘महायुतीला विधानसभेच्या १९० पर्यंत जागा मिळू शकतात. मात्र त्यापैकी १३५ जागा वाट्याला आल्या तरच त्यात भाजपचा १०५ ते ११० पर्यंत वाटा असू शकओ. मात्र स्वबळावर म्हणजे सर्वच २८८ मतदारसंघांत लढल्यास ११५ जागांवर सहज विजय मिळवू शकतो,’ असे निष्कर्ष पक्षाने केलेल्या एका खासगी सर्वेक्षणातून समोर आल्यानेच भाजपने शिवसेनेला वेठीस धरल्याचे दिल्लीतील राजकीय वर्तुळातून सांगितले जाते. दरम्यान, युतीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सर्व घडामोडींची माहिती दिली.

‘शिवसेनेच्या कोणत्या नेत्यासोबत चर्चा करायची हा प्रश्न केंद्रीय नेतृत्वासमोर असतो. बाळासाहेबांचा काळ आता राहिला नाही. त्यामुळे युतीबाबत दोन दिवस प्रतीक्षा करू; आमची मागणी मान्य होत असल्यास ठीक, अन्यथा २८८ जागा लढवण्याची आमची तयारी आहे,’ असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी चार ते पाच संस्थांकडून राज्यात सर्वेक्षण केल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. या सर्वेक्षणात शिवसेनेसोबत युती झाल्यास १९० पर्यंतचा आकडा गाठता येणे शक्य असल्याचे निष्कर्ष आले आहेत. त्यात एकट्या भाजपला १०५-११० जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र त्यासाठी भाजपला किमान १३५ ते १४० जागांवर निवडणूक लढवावी लागणार आहे. परंतु युती होऊ शकली नाही आणि भाजप स्वबळावर लढत असल्यास भाजप ११५ जागांवर विजय मिळवू शकते, असेही हे सर्वेक्षण सांगते. या पार्श्वभूमीवर शहा व गडकरी यांच्यात चर्चा झाली. त्या वेळी स्वबळावर किमान ९५ तरी जागा निवडून आणण्याचा विश्वास देत महाराष्ट्रात भाजपचेच सरकार सत्तारूढ करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याचे गडकरी यांना शहा यांनी सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेवर नाराजी
इकडे शिवसेना भाजपला ११९ जागा देण्यास तयार आहे, त्यातही १० जागा भाजपने त्यांच्या मित्रपक्षांना द्यायच्या आहेत. याचाच अर्थ शिवसेना भाजपला १०९ जागा सोडण्याची मानसिकता दर्शवत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे वाहिन्यांना सांगत सुटले आहेत. भाजपला ही बाब जिव्हारी लागत आहे. जागांच्या टक्केवारीनुसार ज्याचे जास्त उमेदवार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री होईल अशी भूमिका ही भाजपची आहे.

मोदी लाटेचा अजून विश्वास
लोकसभेतील मोदी लाटेचा परिणाम अजूनही राज्यात आहे, असे दावे भाजपचे नेते आजही करत आहेत. परंतु शिवसेनेची राज्यातील संघटनात्मक बांधणी ही मजबूत असल्याची जाणीव भाजपला असल्याने युती तोडणे धोक्याचे होईल, याकडे राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाचे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी नरेंद्र मोदींनी गडकरींकडून राज्याचा आढावा घेतला तर अमित शहा हे सुद्धा इत्थंभूत माहिती घेणार आहेत. आम्ही शिवसेनेला १३५ जागा मागितल्या आहेत, चर्चेअंती १३० पर्यंत तडजोड होऊ शकते. मात्र, त्या केवळ भाजपच्याच राहातील. शिवसेना जर सन्मानजनक जागा देण्यास तयार नसेल तर ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेण्याशिवाय पर्याय उरणार नाही, याकडे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले.