आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिंगण: स्वप्नपूर्तीचा ‘चतुर’ भंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेनेचे धाकले महाराज, फोटोग्राफभूषण शिवबंधनकार यांनी ‘लाट ओसरली, लाट ओसरली’ अशी कितीही बोंब ठोकली असली तरी महाराष्ट्रात कमळाचार्यांची लाट असल्याचे सर्व्हे सर्वत्र प्रकाशित व प्रसारित झाले. त्यामुळे आंध्रच्या किनारपट्टीवर दाखल होण्यापूर्वीच राज्यातील इतर पक्षांत काळजीचे ‘हुडहुड’ वादळ घुमायला लागले आहे. कमळाबाईच्या गोटात या सर्व्हेने आनंदाची लाट उसळली आहे. आता शत-प्रतिशत कमळाची शेती फुलवण्यासाठी सर्वांनीच सांघिक उथिष्ट (चूकभूल देणे-घेणे) करून १४५ चे एकच उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कमळाच्या बिनीच्या सरदारांनी सर्वांना दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. कराग्रे वसते लक्ष्मी... चे स्वर आता सर्वत्र जोरात ऐकू येऊ लागले आहेत. जनमत चाचण्यांत कमळाच्या पारड्यात १०० हून जास्त जागा दिसत असल्याने कमळाच्या गोटातील मुख्यमंत्रिपदांचे दावेदार आता पुढच्या फील्डिंगच्या कामाला लागले आहेत.
‘लक्ष्मी’दर्शनाने सर्वत्र एकच गर्दा माजवून नागपूरकर नितीन भौ मस्त ‘गाजर का हलवा’वर ताव मारत जनमत चाचण्यांतील आकड्यांवर नजर टाकत आपल्या वाड्यातील झोपाळ्यावर बसले आहेत. झोपळ्यावर जागा कमी आणि खाद्यपदार्थांची ताटे जास्त झाल्याने भौंची तारांबळ उडाली आहे. तेवढ्यात भौंचा मोबाइल खणखणला...
‘बोल बे भैताड्या, कुठं असतो बे ऐन वक्ताले?’
‘तसं नाही भौ, तं वकिलाकडं गेलतू तुमच्यावाल्या.’
‘काहून बे ?’
‘ते लक्ष्मीदर्शन प्रकरण.’
‘ते जाऊ दे बे, जनमत चाचण्या पाहिल्या काय बे तू, मले तं कसंच होऊन राहिले बे. दिल्लीत तं मनंच लागेना.’
‘तसं नाय भौ, तुमी इकडं आलं तं चांगलं ह्ये, पर..’
‘पर काय बे.. अरे, बटाटेवडे संपले बघा... अजून आणा..’
‘काय भौ.. ?’
‘तुला नाय बे, तू बोल, ह्यो पर कशाले म्हणतो बे अशा वक्ताले...’
‘पर भौ..’
‘बोल ना बे भैताड्या, इकडं खाऊन मी राहिलो अन् घास तुह्या नरडेत अडकून राहिला का बे... पर.. पर काय लावले?’
‘पर भौ... इकडं तं येगळंच ऐकून राहिलो ना मी..’
‘काय बोलून राहिले बे सारे?’
‘सारे नव्हं भौ... एकच बोलून राहिला..’
‘काय तं सांगतो का भैताड्या... एकच कोण बोलून राहिला.. अन् काय बोलून राहिला..?’
‘ते कमळाचार्य आहेत ना भौ.. ते तं म्हणू लागले चतुर पंडित कसे हुशार आहेत ते, कसं झ्याक राज्य चालवतील म्हणून.. नागपूरले सभा झाली तवा तं लय तारीफ केली नं त्यांनी चतुरवाल्यांची...’
ते ऐकताच भौंच्या घशात वड्याचा घास अडकला... त्यांना जोरात ठसका लागला... त्यांनी फोन कट केला..
कितीही लक्ष्मीदर्शन घडवले तरी स्वप्न‘पूर्ती’ होते की नाही या शंकेने भौंचा जीव कासावीस झाला व ते पुढच्या फील्डिंगला लागले.
रिंग मास्टर