पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या बीड व औरंगाबादच्या सभा पाहिल्या तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, ती म्हणजे महाराष्ट्रात भाजपला सत्तेवर आणण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्रातील आव्हान सोपे नाही. युती तुटल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. सेनेच्या मराठी बाण्याला माध्यमांसह अन्य पक्षांतूनही खतपाणी मिळत आहे. त्याला प्रतिसादही आहे.
मराठी माणसांच्या भावनांना हात घालून मते मिळवण्यावर प्रथम शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी भर दिला आहे. महाराष्ट्रावर आक्रमण करण्यास मोदी येत आहेत, अशी हवा तयार झाली आहे. महाराष्ट्र हे भाजपसाठी मित्रराष्ट्र राहिलेले नाही. या बदलत्या वाऱ्यांची पूर्ण जाण मोदी यांना असावी. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला प्रत्युत्तर देताना मोदींनीही भावनिक प्रचारावर भर दिला. त्यांनी प्रथम गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेचा उपयोग करून घेतला. मुंडेंचा भाऊ म्हणून ते बीडच्या जनतेसमोर आले. भाजपमध्ये मुंडेंचे महत्त्व कमी झालेले नाही हे त्यांना लोकांच्या मनावर ठसवायचे होते. मुंडे बहिणींच्या मागे मी उभा आहे हा संदेश त्यांनी दिला व त्याचा परिणाम महाराष्ट्रात अन्यत्रही होईल. छत्रपती शिवाजी महाराजांसह महाराष्ट्राच्या दैवतांचा खुबीने उपयोग करीत त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचे जरूर ते कोडकौतुक केले. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राची साथ मिळाल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही असेही म्हटले.
आपण गुजरातचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेते आहोत व माझ्यासाठी मते द्या, हे मराठी मतदारांवर ठसवण्याची त्यांची धडपड होती. पूर्ण बहुमत मिळवणे हेच एकमेव ध्येय त्यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले व जनतेला तसेच आवाहन वारंवार केले. लोकसभेमध्ये याच पद्धतीने मोदींनी प्रचाराला सुरुवात केली होती व एकपक्षीय राजवटीची मागणी प्रचारात तीव्र करीत नेली होती. शिवसेनेचा त्यांनी उल्लेखही केला नसला तरी काँग्रेसमुक्त महाराष्ट्रापेक्षा शिवसेनामुक्त भाजपला सत्तेवर आणा, हेच त्यांना सुचवायचे होते. भावनिक आवाहनाला केलेल्या कामाची जोड देण्याची संधी मोदींना मिळते आहे व इथे त्यांना अन्य पक्षांवर कुरघोडी करता येते. दणदणीत बहुमत मिळाल्यामुळेच मला अमेरिकेत डंका वाजवता आला हे सांगताना,भाजपच्या बहुमताचा डंका वाजला तर महाराष्ट्राचे दिल्लीत वजन वाढेल हे त्यांना सुचवायचे होते. हा युक्तिवाद लोकांना पटल्याचे प्रतिसादावरून कळत होते. मोदींच्या प्रचाराचे वैशिष्ट्य असे असते की खेळाचे नियम ते स्वत: ठरवतात व त्यानुसार अन्य पक्षांना खेळायला लावतात. लोकसभा निवडणुकीत अजेंडा नेहमी तेच ठरवत होते व अन्य पक्षांना उत्तरे द्यावी लागत होती. ते स्वत: कोणालाही उत्तरे देत नाहीत. महाराष्ट्रातही याच पद्धतीने ते प्रचार करणार असे दिसते. बीड, औरंगाबादची गर्दी व गर्दीतून मिळणारा प्रतिसाद पाहता राज्यातील मोदी ज्वर अद्याप ओसरलेला नाही. मात्र त्याचा फायदा उठवणारी पक्ष यंत्रणा भाजपकडे आहे का, याची शंका आहे.