राहुरी- राहुरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणाऱ्या नगराध्यक्ष डॉ. उषा तनपुरे यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री जयंत पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शनिवारी (२७ सप्टेंबर) शेवटची मुदत असल्याने शुक्रवारी राजकीय घडामोडींना वेग आला. राहुरी मतदारसंघात भाजपकडून आमदार शिवाजी कर्डिले उमेदवार आहेत. युती तुटल्यामुळे शिवसेनेकडूनही उमेदवार देण्यात येणार आहे. ही उमेदवारी कुणाला मिळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. डॉ. तनपुरे यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्जही दाखल केला.
मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. उषा यांचे पती माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांचा
भाजपचे कर्डिले यांनी ८ हजार ३३३ मतांनी पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी गाडे, तर काँग्रेसकडून प्रा. कृष्णागर जेजूरकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून कर्डिले यांचा अर्ज दाखल
केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपला स्वबळावर सत्ता द्या. भाजपची सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू, असे भाजपचे उमेदवार आमदार शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या जाहीर सभेत बोलताना शुक्रवारी सांगितले. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राम कदम होते. माजी आमदार चंद्रशेखर कदम, आसाराम ढूस, उत्तम म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.