आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Chief Raj Thackeray Election Rally At Mumbai

सीमेवर जवान शहीद होत आहे, हे अच्छे दिन का? राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंबिवली/ मुंबई - कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, भाजपच्या या जाहीरातींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे प्रमुख राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मुंबईतील उद्योगपतींना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन केले. आमचा महाराष्ट्र काय गुजरातमध्ये नेऊन ठेवयाचा का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते.

केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करताना राज ठाकरे म्हणाले, सत्ता बदलल्या नंतर काय बदल झाला? कालही सीमेवर जवान शहीद होत होते आणि आजही आमचे जवान शवपेटीतून परत येत आहेत. काँग्रेसच्या काळातही हेच झाले आणि आताही तेच होत आहे. पाकिस्तानला आम्ही मिठाई पाठवत आहोत आणि ते आमच्या जवानांवर गोळीबार करत असताना आमचे पंतप्रधान हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपचा प्रचार करत आहेत. दहा - पंधरा दिवसांसाठी पंतप्रधान कार्यालय बंद करण्यात आले आहे. ईदीच्या दिवशी जवान शहीद होत आहे, हे यांचे अच्छे दिन का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

मोदी काँग्रेस - राष्ट्रवादीचा प्रचार करत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी राज्यात येत आहेत. भाजपने स्वबळाची भाषा करुन राज्यातील 50 हून अधिक मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेल्या उमेदवारांना तिकीट दिले. या उपर्‍यांच्या जोरावर भाजपची स्वबळाची भाषा का? बाळासाहेबांमुळे यांना बळ मिळाले आणि आता हे बेटकुळ्या दाखवू लागलेत, असा जोरदार हल्लाही राज यांनी चढवला.
महापालिका, जिल्हा परिषदेच्या प्रचारालाही मोदी येतील
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील दोन वर्षांनी होणार्‍या कल्याण - डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठीही येतील. त्यानंतर जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या प्रचारासाठीही येतील, असे सांगत मोदी पंतप्रधान पदाला साजेसे वागत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले.

'चारही पक्षांनी सर्व ठरवून केले'
युती आणि आघाडी तुटण्यावर हल्ला चढवताना राज ठाकरे म्हणाले, हा या चारही पक्षांचा गेम प्लॅन होता. शेवटच्या दोन दिवसांमध्ये सर्व उमदेवारांना ए-बी फॉर्म मिळतोच कसा? यांचे सर्व ठरलेले होते, असा आरोप त्यांनी केला. सत्ता कोणाला मिळणार, यासाठीच यांची साठमारी चालू आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याची ब्ल्यू प्रिंट फक्त माझ्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात रोजगार कसे निर्माण करता येईल, येथील तरुण-तरुणींच्या हाताला काम कसे मिळेल याचा आराखडा माझ्याकडे तयार आहे. महाराष्ट्राकडे दाखवण्यासारखे बरेच काही आहे, मात्र आम्हाला त्याचे काहीच नाही. आम्ही दाखवायलाच तयार नाही. महाराष्ट्राला फक्त पर्यटनातून लाखो रोजगार निर्माण करता येतील, असा दावा त्यांनी केला.

(छायाचित्र : संग्रहित )