आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MNS Chief Raj Thackeray Election Rally At Mumbai

राष्ट्रीय पक्षांनी केंद्र पाहावे, महाराष्ट्र सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ आहोत - राज ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गिरगाव (मुंबई) - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे रविवार हा सर्वच पक्षांच्या प्रचारसभांनी दणाणून गेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभा सुरु आहेत. गिरगावमधील सभेत त्यांनी भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली आणि राष्ट्रीय पक्षांनी केंद्रात राहावे महाराष्ट्र सांभाळण्यासाठी आम्ही समर्थ असल्याचे ठणकावून सांगितले.
भाजप महाराष्ट्रात बहुमत मागत आहे, ते कोणत्या जोरावर? असा सवाल उपस्थित करुन राज ठाकरे म्हणाले, ज्यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत ते बहुमत मागत आहे. यांच्याकडे साठहून अधिक काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक उमेदवार म्हणून आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी बहुमत मागत आहेत. जे कालपर्यंत तुमच्यासाठी भ्रष्टाचारी होते, ते आज संत झाले का? असा सवाल त्यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर टीका
आर.आर.पाटील यांच्या निवडणुकीनंतर बलात्कार करा, या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये कशी होती, हे सांगत यांच्या ताब्यात महाराष्ट्र देणार का? असा जनतेला सवाल केला.
महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्षांची गरज नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रत्येक सभेतून महाराष्ट्रात पूर्ण बहुमत द्या, अशी आळवणी करत आहेत. त्याचा उल्लेख करुन राज ठाकरे म्हणाले, यांच्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी एकही लायक माणूस नाही, काय करायचे यांना बहुमत. मोदी दिल्लीतून येऊन महाराष्ट्राचा कारभार पाहाणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पहिले केंद्रात काँग्रेसचे सरकार होते आणि राज्यात आघाडीचे, त्यांनी मिळून महाराष्ट्राचे वाटोळे केले, आता हे मोदी बहुमत मागत आहेत, असे सांगत ठाकरे म्हणाले, यांची राज्यात गरजच काय? तुम्ही केंद्रात राहा, महाराष्ट्रात आम्ही आहोत. जयललिता, ममता पाहात नाही का स्वतःची राज्य. येथे आम्ही आमचे पाहून घेऊ.