चारकोप / मुंबई - मुंबईचा विचका करुन ठेवला आहे. राज्यामध्ये फक्त शहरे सुज आल्यासारखे वाढत आहेत. कोणाला काहीच देणे घेणे नाही, आणि परत तोंडवर करुन मते मागायला येतात, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत आहेत. झोपडपट्या वाढत नसून जाणिवपूर्वक वाढवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी आघाडी सरकारवर केला.
रामदास आठवले यांच्या भाषणाची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले, 'हे बक्कल जन्माला आलं', अशी बोचरी टीका त्यांनी केली. आठवलेंना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती, त्याचाही राज यांनी समाचार घेतला. 'यांना उपमुख्यमंत्री केले असते तर काय झाले असते महाराष्ट्राचे,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
झोपडपट्ट्या वाढवल्या जात आहे. त्यासाठी परप्रांतातून लोक आयात केले जातात. मग त्यांना सोईस्कर पद्धतीने उठवले जाते आणि एसआरए स्किमच्या नावाखाली भूखंड लाटले जात आहेत.
भाजपकडे नेतेच नाही
राज्यात भाजपकडे नेतेच नाहीत, असे सांगत राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, यांच्याकडे राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. विनोद तावडे राहातात एकीकडे आणि निवडणूक लढवतात दुसर्याच मतदारसंघातून.
मोदींच्या गुजारात प्रेमावर पुन्हा हल्लाबोल
पंतप्रधान
नरेंद्र मोदी राज्यात रोज सभा घेत आहेत. त्यांनी किती सभा घ्याव्या हा त्यांचा प्रश्न आहे. पण सीमेवर पाकिस्तानकडून
आपले जवान मारले जात असताना पंतप्रधानांनी कुठे राहायला हवे, असा सवाल त्यांनी केला. तुम्हाला ढोकळा प्रिय असेल, तर आम्हालाही बटाटा वडा आवडतो असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी राज्यात सभा घेण्याला विरोध नाही, पण उद्या आणखी कोणत्या राज्यात निवडणुका लागल्या तर मोदी तिकडेही जातील तर कारभार केव्हा करणार? महापालिका, जिल्हा परिषद आणि बँकाच्या निवडणूकातही पंतप्रधान प्रचाराला येणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.