आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐनवेळच्या माघारीने मनसे कार्यकर्ते नाराज, बारापैकी चारच मतदारसंघांत उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अंतर्गत गटबाजीमुळे मनसेने नगर शहरात ऐनवेळी माघार घेतली. जिल्ह्यातही सर्व ठिकाणी पक्षाला सक्षम उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील बारापैकी केवळ चार विधानसभा मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

नगर शहरात मनसेमध्ये दोन गट आहेत. संघटना व महापालिकेत हे दोन गट कार्यरत आहेत. चार नगरसेवकांचा एक गट व पक्षातील विद्यमान पदाधिकारी असे हे दोन गट आहेत. हे दोन्ही गट समोरासमोर येण्याचे टाळतात. त्याचा फटका अलीकडच्या काळात पक्षाच्या संघटनवाढीला बसला आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले, तसे मनसेचे जिल्हा सचिव वसंत लोढा व मनपा स्थायी समितीचे सभापती किशोर डागवाले या दोघांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली होती.
सुमारे महिनाभरापूर्वी वरिष्ठ नेत्यांनी लोढा यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे लोढा यांनी कंबर कसली होती; परंतु शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून लोढा भाजपच्या संपर्कात गेले. ही बाब समजताच पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी किशोर डागवाले यांच्याकडे धाव घेतली. या नेत्यांनी डागवाले यांनाच उमेदवारीची गळ घातली. डागवाले यांनी चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली; परंतु ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरणे अशक्य असल्यामुळे त्यांनाही अर्ज भरता आला नाही. या घडामोडींमुळे ऐनवेळी नगर शहरात उमेदवार न देण्याची नामुष्की पक्षावर ओढावली. मनसेने जिल्ह्यातील बारापैकी चारच मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. नेवासे, पारनेर, शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेड या मतदारसंघात मनसेचे उमेदवार नशीब जमावत आहेत. गटातटाच्या राजकारणामुळे शहरातील सामान्य कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत.