नवी दिल्ली - महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान
नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष
अमित शहा यांच्यासह ज्येष्ठ नेत लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचेही नाव होते; परंतु या दोन्ही नेत्यांची दोन्ही राज्यांमध्ये एकही सभा झाली नाही. अडवाणी यांच्या महाराष्ट्रात सभा व्हाव्यात यासाठी प्रचार कार्यक्रम तयार करणा-या समितीने मागणी केली होती, मात्र शहा यांनी ती फेटाळून लावल्याचे समजते.
या दोन्ही राज्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी ३६ सभा घेतल्या. त्या खालोखाल प्रत्येकी २०- २२ सभा अमित शहा व केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी घेतल्या; परंतु पक्षात सर्वात ज्येष्ठ असलेले अडवाणी आणि जोशी यांचे नाव स्टार प्रचारकांमध्ये असूनही त्यांना सभा घेण्यासाठी आग्रह झाला नाही. ‘नवा गडी; नवा राज’वर आधीच नाराज असलेल्या या दोन्ही नेत्यांना महाराष्ट्रापासून दूर केल्याने ते प्रचंड नाराज झाले असल्याचे कळते. स्वत:चे राज्य असलेल्या महाराष्ट्र व हरियाणात अनुक्रमे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सुषमा स्वराज यांनी सभा गाजवल्या; परंतु या नेत्यांच्या सभांना विशेष गर्दी होऊ शकली नाही. प्रचारामध्ये भाजपचा ‘चलो चले मोदी के साथ’ हाच नारा दिसून आला. मोदी विरुद्ध इतर असे चित्र दोन्ही राज्यांत पाहायला मिळाले. दोन्ही राज्यांमध्ये भाजपने ज्या जाहिराती केल्यात त्यातही एकमेव नरेंद्र मोदी लक्षवेधी होते.
लालकृष्ण अडवाणी यांना महाराष्ट्राने नेहमीच सन्मान दिला आहे. त्यांच्या सभांना आतापर्यंत चांगली गर्दीही झाली आहे. शिवसेनेशी युती तुटल्यावर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, प्रचार कार्यक्रम तयार करणा-या समितीने अडवाणी यांची मुंबई आणि नागपूरमध्ये सभा व्हावी, अशी मागणी केली होती. परंतु ती बाब मान्य करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.